नवी मुंबई : विना हेल्मेट प्रवास करणाऱ्यांना लगाम लावण्यासाठी नवी मुंबई आरटीओने शहरातील खासगी कंपन्या, शासकीय कार्यलये, महाविद्यालयांना हेल्मेट सक्तीबाबत १९४ डी अंतर्गत नोटीस बजावली होती. शहरातील १९२ कंपन्यांना ही नोटीस बजावली असून, आरटीओने आता विना हेल्मेट कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बगडा उगारला आहे.
दोन दिवसात ६० जणांवर कारवाई करण्यात आली असून प्रत्येकी एक हजार रुपये अशी दंडात्मक वसुली, तसेच लायसन्स निलंबनाची कारवाई केली आहे, अशी माहिती आरटीओ विभागाने दिली. शहरात झपाट्याने नागरीकरण वाढत आहे, त्याच धर्तीवर वाहनेदेखील वाढत आहेत. मात्र या वाढत्या वाहनांबरोबर नवी मुंबईत वाहतूक नियम तोडणाऱ्यांची संख्यादेखील वाढत चालली आहे. दिवसेंदिवस राज्यात वाहन अपघातांच्या संख्येत वाढ होत असून त्यातील बहुतांश अपघात हे दुचाकीचे असून यात विना हेल्मेट प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. दुचाकी अपघातात मृत्यू पावणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. हेल्मेट सक्तीबाबत नवी मुंबई आरटीओ विभागाने खासगी कंपन्या, शासकीय कार्यालये, महाविद्यालय यांना नोटीस बजावून जनजागृती केली होती. त्यानंतर आता दोन दिवसांपासून या खासगी शासकीय कार्यालयांमध्ये विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बगडा उगारला असून दोन दिवसांत ६० जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
हेही वाचा – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मे २०२४ ला लोकार्पण
हेल्मेट सक्तीबाबत नवी मुंबई शहरातील खासगी कंपन्या, शासकीय कार्यालये, महाविद्यालयांमध्ये हेल्मेट सक्तीबाबत जनजागृती करण्यात आली होती. त्यानंतर आता दोन दिवसांपासून कार्यालयात विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. – हेमांगी पाटील, उपप्रादेशिक अधिकारी, वाशी आरटीओ