नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून व्यवसाय परवान्याशिवाय, अनधिकृतपणे वाहनविक्री करणाऱ्या वाहनवितरकांवर करडी नजर ठेवत कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारी कोपरखैरणे येथील दोन वाहन वितरकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांचा व्यवसाय बंद करण्यात आला असून त्यांच्याकडील विक्रीसाठी ठेवण्यात आलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत,अशी माहिती आरटीओने दिली आहे.
नवी मुंबई शहरात दिवसेंदिवस वाहनविक्री दुकाने थाटली जात आहेत; परंतु वाहनविक्री व्यवसाय करण्यासाठी दुकानदार किंवा डीलरकडे वाहनविक्री व्यवसायाचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. मात्र सद्य:स्थितीत काही वाहनविक्री करणारे वितरक, सबडीलर व्यवसाय प्रमाणपत्राशिवायच वाहनांची विक्री करत आहेत. व्यवसाय प्रमाणपत्राशिवाय वाहनविक्री करणाऱ्यांबाबत आरटीओला महिती प्राप्त होत आहे. त्या अनुषंगाने कोपरखैरणे येथील दोन जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडील वाहने जप्त करीत दुकाने बंद करण्यात आली आहेत. दीड महिन्यात चार जणांवर कारवाई करण्यात आली असून अशा प्रकारे अनधिकृतपणे वाहनविक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती आरटीओ उपप्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील यांनी दिली आहे.