आठवडाभरात १९८ रिक्षाचालकांवर, तर भरधाव ७२२ वाहनांवर कारवाई
नवी मुंबई : शहरात वाहतूक नियमांचे वाहनचालकांकडून पालन होत नसल्याने आता वाहतूक पोलिसांबरोबर ‘आरटीओने’सुद्धा कारवाईचा बडगा उचलला असून आठवडाभरात १९८ रिक्षाचालकांवर तर ७२२ भरधाव वाहनांवर कारवाई केली आहे. दोन आठवडय़ांपूर्वी ‘आरटीओ’ने ७७ रिक्षांवर कारवाई केली होती. तसेच कारवाईत सातत्य ठेवण्याचे सांगितले होते.
शहरात पामबीच मार्गावर वाहनांच्या अतिवेगाने अपघाताच्या घटना घडत आहेत. तसेच रिक्षाचालक मनमानीपणे जादा भाडे आकारणी, मीटरवर भाडे नाकारणे तसेच गणवेश न परिधान करणे अशी मुजोरी करीत आहेत. आरटीओने १७ दिवसांत ७२२ भरधाव वाहनांवर तर १९८ रिक्षांवर कारवाई केली आली असून दंड वसूल करण्यात आला आहे. पुढील कालावधीत ही कारवाई सुरूच ठेवण्यात आहे. ठाणे-बेलापूर रस्ता, पामबीच मार्गवर ही कारवाई करण्यात आली आहे.
पामबीच मार्गावर भरधाव वेगवान वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. स्पीड गनच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली आहे. भरधाव वाहनाचा क्रमांक, वाहनाचा वेग यांसह त्या वाहनाच्या छायाचित्राची प्रत वाहनचालकाला जागेवरच उपलब्ध करून संबंधित कारवाईचे चलन मोबाइलवर पाठविले जात आहे.
रिक्षांवर कारवाईत सातत्य ठेवणार
नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाने नियम १४ ते १७ डिसेंबर या चार दिवसांत १९८ रिक्षांवर कारवाई केली असून १ लाखाहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे अशी माहिती नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगी पाटील यांनी दिली आहे.