नवी मुंबई : नवी मुंबईतील पामबीच मार्गावर विविध उपाय योजना करूनही अपघात सत्र सुरूच असल्याने वाहतूक पोलिसांनी गतिरोधक अशक्य असल्यास किमान रम्बलर तरी बसवा अशी मागणी पालिकेकडे केली आहे. दरम्यान या संदर्भात वाहतूक पोलीस व पालिका प्रशासन एक संयुक्त बैठक घेऊन याबाबत ठोस निर्णय घेणार आहेत.
तीन दिवसांपूर्वी पामबीच मार्गावर भरधाव वेगाने तिघांचा बळी घेतला. यापूर्वीही असे अनेक अपघात झाले असून हे अपघात सत्र सुरूच आहे. या मार्गावर वेगमर्यादा ही ६० किमोमीटर प्रतितास इतकी आहे. असे असताना या वेगमर्यादेचे पालन होताना दिसत नाही. रात्रीच्या वेळी तर शंभरपेक्षा अधिक वेगाने वाहने चालवली जातात. त्यामुळे वाहनावरचा ताबा सुटून या ठिकाणी वारंवार अपघात होत असतात. यावर वाहतूक पोलिसांनी या ठिकाणी स्पीड गनच्या माध्यमातून वाहनांचा वेग रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र वाहनचालक स्पीड गनच्या टप्प्यात वाहनांचा वेग कमी करतात असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे गतिरोधक बसवण्याची मागणी वाहतूक पोलिसांनी महापालिका प्रशासनाकडे वारंवार केली आहे. मात्र महामार्ग असल्याने न्यायालयाच्या निर्देशानुसार तेथे गतिरोधक बसवता येत नाही, असे महापालिकेचे म्हणणे आहे. बुधवारच्या अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी गतिरोधक शक्य नसतील तर किमान अपघात होत असलेल्या ठिकाणी रम्बलर तरी बसवा अशी मागणी केली आहे.
अपघात स्थळे
पामबीच मार्गावर बेलापूर ते वाशी दरम्यान एनआरआय वसाहत चौक, चाणक्य सिग्नल, अक्षर चौक आणि सानपाडा चौकाआधीचा वळण रस्ता तर वाशी बेलापूर मार्गावर सानपाडा सिग्नल, नेरुळ सिग्नल आधीचा सुमारे एक किलोमीटर उजवीकडे वळणारा रस्ता आदी ठिकाणी रम्बलर बसवणे गरजेचे आहे.
याबाबत महापालिकेकडे गतिरोधकांची मागणी यापूर्वीच करण्यात आली आहे. मात्र तांत्रिकदृष्टय़ा शक्य नसल्याने निदान रम्बलर बसवावे अशी मागणी केली आहे. हे रम्बलर अपघातस्थळी किमान वीस फूट बसवणे अपेक्षित आहे. -दत्ता तोटेवाड , साहाय्यक आयुक्त, वाहतूक पोलीस विभाग
द्रुतगती मार्ग नियमानुसार गतिरोधक बसवणे शक्य नाही. त्यामुळे रम्बलर बसविण्याचा विचार आहे. याबाबत लवकरच वाहतूक विभाग आणि पालिका अधिकारी यांच्यात बैठक घेण्यात येणार आहे. यात अपघात रोखण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यात येईल. -संजय देसाई, शहर अभियंता, महापालिका

Story img Loader