पनवेल : नवी मुंबईत ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली अवैधपणे डान्सबार चालवले जातात. अवैध बारसंस्कृतीवर आळा बसविण्यासाठी नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी कंबर कसली आहे. वेळोवेळी कारवाई करूनही बिभस्त आणि अश्लील चाळे बारमध्ये थांबणार नसल्यास आयुक्तांकडून अशा बारचे परवाने रद्द करण्याच्या हालचाली सूरू झाल्या आहेत.
बारचालक व मालकांना शिस्तीचे वळण लावण्यापूर्वी नवी मुंबई पोलिसांनी अशा बारचालकांवर नेमके कोणत्या कायदा व नियमाप्रमाणे कार्यवाही करावी यासाठीच्या मार्गदर्शक सूचना आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दोन दिवसांपूर्वी काढल्या आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात नवी मुंबई ते पनवेलपर्यंत शंभराहून अधिक लेडीज सर्व्हिस बार (ऑर्क्रेस्ट्रा) आहेत. आयुक्त भारंबे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर वेळेचे बंधण न पाळणाऱ्या आणि बिभस्त चाळे करून डान्सबार चालणाऱ्या बारवर धाडीचे सत्र सुरू केले आहे.
हेही वाचा – नवी मुंबई : नेरुळ सेक्टर २३ येथे अनधिकृत बांधकामावर पालिकेची तोडक कारवाई
तीन दिवसांपूर्वी तीन वेगेवगेळ्या बारवर धाड टाकून बारचालकांची झोप उडवली. मात्र नुसती कारवाई करून वातावरण निर्माण करणारे आयुक्त भारंबे नसल्याने त्यांनी सध्या ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्सबार चालवले जातात याकडे लक्ष वेधले आहे. बारवर कारवाई करताना पोलीस पथकाने कायद्यातील कोणते कलम व नियमांच्या आधारे कारवाई करावी याची कार्यपद्धतीची नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीची प्रत त्यांनी नवी मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना आणि पोलीस उपायुक्तांना दिली आहे. या नियमावलीमध्ये ऑर्केस्ट्रा बार आस्थापनांना जागेचा व मनोरंजनाचा परवाना दिला जातो, मात्र परवाना देताना नियमांच्या अटींचा भंग केल्यास परवाना रद्द करण्याची पद्धत अवंलबण्याचे निर्देश दिले आहेत.
विशेष म्हणजे, यापूर्वीही अनेक पोलीस आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यावर बारवर शेकडोवेळा धाडी टाकल्या. धाडीनंतर परवाना रद्द करण्याचे प्रस्ताव पोलीस उपायुक्तांपर्यंत पाठविण्यात आले. परंतु, त्यानंतर गेल्या पाच वर्षांत परवाना रद्द करण्याची कारवाई शुन्यच आहे. परंतु, आयुक्त भारंबे यांच्या या ठळक आदेशानंतर किती बारचालकांना शिस्तीचे धडे मिळतात याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
आयुक्त भारंबे यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ठळक निर्देशांची प्रत बारवर कारवाई करणाऱ्या पोलीस पथकाला दिली आहे.
- लायसन्स धारकाने किंवा कोणीही बारमध्ये प्रयोग करणाऱ्या व्यक्तीने, प्रदर्शन निर्मिती, दर्शन किंवा सादरीकरण याच्या सुरुवातीला मध्यंतरात किंवा अखेरीस किंवा ते चालू असताना मंचावर किंवा प्रेक्षागाराच्या कोणत्याही भागात पोशाख, नृत्य, हालचाल किंवा अंगविक्षेप यातील असभ्यता ही कृत्ये करण्याची परवानगी देणार नाही किंवा स्वतः करणार नाही.
- लायसन्सधारकाची स्वताची जबाबदारी मुख्य असून कार्यक्रमात सर्व नियमांचे पालन करण्यास आणि सर्वसाधारणपणे अशा जागेच्या चांगल्या व्यवस्थापनास सर्वोतोपरी आवश्यक असलेली सावधगिरी बाळगणार.
- लायसन्सधारकाने स्वतः किंवा लायसनवर नामनिर्देशित व्यवस्थापक व्यक्तीने आस्थापनेत संपूर्ण वेळ हजर राहणे आवश्यक आहे.
- लायसन्सधारकाने जागेतील कार्यालयाच्या भिंतीवर ठळक जागी लायसन्स प्रदर्शित करणे आवश्यक आहे.
- लायसन्सधारक आस्थापनेच्या ठिकाणी त्याचा किंवा तिचा पेशा किंवा व्यवसाय लायसन्समध्ये नमूद प्रमाणे व्यवस्थितरित्या करतील.
- आस्थापनेत अग्निक्षेपक यंत्रणेची व्यवस्था असावी.
- आग विझविण्यासाठी पाणी व मातीने भरलेल्या बादल्याची व्यवस्था असावी.
- आस्थापनेत रासायनिक अग्नीशमके (फायरएक्सटिंग्विशर) याची व्यवस्था असावी.
- आस्थापनेत दरवाजे व इतर ठिकाणी निर्गमन मार्ग व निर्गमन मार्ग नाही या खुणा ठळकपणे लावाव्यात.
- ऑर्केस्ट्रा बार आस्थापनेला लाईव्ह ऑर्केस्ट्राकरिता जागेचा व मनोरंजनाचा परवाना दिला जातो त्यामध्ये ‘वेळ मर्यादा’ नमुद केली आहे, त्यांचे पालन होणे आवश्यक आहे.
बारचा परवाना देतानाच्या अटी
- ऑर्केस्ट्रा आस्थापनेतील मंचाचा आकार 10×12 फुट असणे अनिवार्य आहे.
- कोणत्याही प्रकारचे नृत्य निषिद्ध आहे.
- मंचावरील कलाकारांना ग्राहकांसोबत मिसळण्यास मनाई आहे. पोशाख हालचाल किंवा अंगविक्षेप यातील असभ्यता ही कृत्ये करण्यास मनाई आहे. ऑर्केस्ट्रा करणाऱ्या कलाकरांकरीता कायमस्वरुपी नोंदवही ठेवून, त्यामध्ये त्यांचे नाव, वय, गावचा व सध्याचा पत्ता नमुद असणे आवश्यक आहे.