लोकसत्ता टीम

पनवेल : नवी मुंबई पोलीस दलातील १८५ पोलीस शिपाई पदांसाठीची भरती प्रक्रियेला रविवार पहाटेपासून सुरुवात झाली. पावसामुळे मैदानात धावणीची परिक्षा घ्यावी कशी असा प्रश्न उभा राहील्याने पोलीस आयुक्तांनी रोडपाली मुख्यालयासमोरील काँक्रीटच्या रस्त्यावर १६०० मीटर धावणीसाठी रस्त्यालाच धावपट्टी करुन त्यावर तोडगा काढला. रविवारी पहाटे पाच वाजल्यापासून साडेतीनशे पोलीसांच्या बंदोबस्तामध्ये पोलीस भरतीला सुरुवात झाली. रोडपाली लिंकरोडवरील काँक्रीटच्या रस्त्यावर धावणी होणार असल्याने हा रस्ता वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. 

पावसाळ्यात मैदानात झालेल्या चिखलात १६०० मीटरसारखी धावणीची परिक्षा घेण्याचे आव्हान नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्यासमोर होते. यावेळच्या भरती प्रक्रियेत ५,९८४ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. अर्जदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उच्चशिक्षित व सुशिक्षित मुलांचा समावेश आहे. आधुनिक परिमापकांचा वापर करुन उमेदवारांची उंची, वजन, छातीचे मोजमाप घेतल्यानंतर रविवारी पहिल्या दिवशी सातशे उमेदवारांची चाचणी घेण्यात आली.

आणखी वाचा-नवी मुंबई: २६ वर्षांत उड्डाण पुलाला तडे, वाहतूक बंद 

बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या उमेदवारांना राहण्याची, जेवणाची व चहापाण्याची सोय नवी मुंबई पोलीस दलाने केली होती. रविवारी पहाटे चार वाजल्यापासून पोलीस बंदोबस्त रोडपाली मुख्यालयासमोर तैनात करण्यात आला होता. उमेदवारांना भरती प्रक्रियेत कमीकमीत त्रास व्हावा असा विचार करुन पोलीस आयुक्त भारंबे, पोलीस उपायुक्त संजय पाटील यांनी नियोजन केल्याचे रविवारी दिसले. पुढील पाच दिवस भरती प्रक्रिया सूरु असल्याने रोडपाली लिंकरोडवरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.