उरण येथील खोपटा कोप्रोली मार्गावर रविवारी मोठ्या प्रमाणात जड कंटेनर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. त्यामुळे उरण मध्ये आता जेएनपीटी प्रमाणेच तालुक्यातील ग्रामीण भागाला ही कंटेनर वाहनांचा विळखा पडू लागला आहे. परिणामी येथील नागरिकांना जड वाहनांच्या कोंडीचा सामना करावा लागत आहे.
हेही वाचा >>> नवी मुंबई : सत्तेसाठी झालेली चूक आम्ही दुरुस्त केली!- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जेएनपीटी बंदरावर आधारित कंटेनर मधील माल साठवणुकीसाठी उभारण्यात आलेली. गोदामे ही पूर्वी उरणच्या पश्चिम विभागातच होती. मात्र ती सरकून सध्या खोपटा खाडी पलीकडील पूर्व विभागातही उभी राहिली आहेत. या गोदामांची संख्या वाढू लागली आहे. उरण तालुक्यातील खोपटा,कोप्रोली,चिरनेर,कळबूसरे, विंधणे, भोम टाकी,दिघोडे,वेश्वि,चिर्ले,जांभुळपाडा आदी गावात ही गोदामे उभी राहत आहेत. त्यामुळे बंदरातून मालाची ने आण करणारी शेकडो जड कंटेनर वाहने या भागातील रस्त्यावरून प्रवास करू लागली आहेत. गोदामात ये जा करणाऱ्या कंटेनर वाहने उभी करण्यासाठी गोदामात वाहनतळ नसल्याने ही कंटेनर वाहने सध्या येथील रस्त्यावरच उभी केली जात आहेत. त्यामुळे या मार्गवर अपघात व कोंडी यांना येथील प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे.