पनवेल न्यायालयात कादंबरीकाराचा दावा
‘सैराट’ या चित्रपटाच्या मूळ कथेचा शिल्पकार आपणच असून आपल्या ‘बोभाटा’ या कादंबरीवरून चित्रपटाची पटकथा उचलण्यात आली असल्याचा दावा कादंबरीकार नाथ माने यांनी पनवेल न्यायालयात शुक्रवारी केला. न्यायदंडाधिकारी न्यायाधीश एस. बी. पाटील यांच्यासमोर दाखल करण्यात आलेल्या या दाव्यात फसवणूक व कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली चित्रपट निर्माते व इतर अशा सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र न्यायालयाने त्यावर अद्याप कोणताही निर्णय दिलेला नाही.
नाथ माने हे सध्या कामोठेत राहत असून, ते मूळचे साताऱ्यातील माण तालुक्यामधील धकटवाडी येथील. त्यांच्या दाव्यानुसार त्यांनी २०१० साली ‘बोभाटा’ ही कादंबरी लिहिली. तिला सुप्रसिद्ध विनोदी लेखक द. मा. मिरासदार यांची प्रस्तावना आहे. या कादंबरीत एका छोटय़ा खेडय़ातील आंतरजातीय प्रेमाची चित्तरकथा रंगविण्यात आली आहे.
नाथ यांना या कादंबरीवरून चित्रपट करायचा होता. न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दाव्यानुसार, त्यासाठी त्यांनी झी टॉकीज व एस्सेल ग्रुपच्या काही प्रतिनिधींची भेट घेतली होती. चित्रपट प्रसिद्ध झाल्यावर त्यांनी चित्रपट निर्मात्या कंपनीशी वेळोवेळी ई-मेलवर संपर्क साधला, मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.