लोकसत्ता टीम
पनवेल : अभिनेता सलमान खानच्या पनवेल येथील शेतघराबाहेरील टेहळणी प्रकरणातील फरार आरोपीला हरियाणातील पानिपत येथून अटक केल्याची माहिती पोलीसांनी दिली. सुखा असे या संशयीत आरोपीचे नाव असून तो लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित आरोपी आहे. पानिपत येथील सेक्टर २९ मधील अनाज मंडी परिसरातील अभिनंदन हॉटेलमध्ये त्याला हरियाणा आणि नवी मुंबई पोलीसांनी पकडले. पोलिसांचे पथक लवकरच सुखाला पनवेल येथील न्यायालयासमोर हजर करणार आहेत.
सलमान खानच्या हत्येचा कट रचण्यात सुखा हा मुख्य सूत्रधार होता. पोलीसांनी सलमानच्या हत्येचा कट उधळून अनेकांची धरपकड केली. मात्र त्यानंतर सुखा हा पोलीसांच्या भितीने सतत पळत होता. दाडी व केस वाढवून तो वेशांतर करुन हरियाणातील हॉटेलमध्ये राहत होता. सुखा हा लॉरेन्स बिश्नोईच्या सूचनेनुसार काम करत असल्याचे पुरावे पोलीसांना सापडले होते. त्यामुळे सुखा याला अटक करणे पोलीसांसमोर आव्हान होते.
सुखाने हत्येचे काम नियुक्त नेमबाज अजय कश्यप उर्फ एके आणि कटात सहभागी असलेल्या इतर चार जणांना सोपवले आहे. कश्यप आणि त्याच्या टीमने सलमान खानच्या फार्महाऊसची तपासणी केली, स्टारच्या सुरक्षा उपायांचे बारकाईने मूल्यांकन केले. अभिनेत्याच्या कडक सुरक्षा आणि बुलेटप्रूफ वाहनांमुळे हत्या घडवून आणण्यासाठी अत्याधुनिक, उच्च दर्जाची शस्त्रे आवश्यक असतील असा निष्कर्ष त्यांनी काढला. सुखा याच्याविरोधात पोलिसांना जे पुरावे सापडलेत त्यामध्ये पाकिस्तानामधील बेकायदा शस्त्र विक्रेता डोगर याच्यासोबत सुखा याचे थेट संबंध असल्याचे मोबाईलवरील दूरदृष्यप्रणालीवरील संभाषण पोलिसांच्या हाती लागले आहेत.
आणखी वाचा-मुख्यमंत्र्यांची शिवसेना मविआला अनुकूल?
सलमानच्या घरावरील टेहळणी आणि शस्त्र्यांच्या देवाणघेवाणीच्या वाटाघाटी करताना सुखा हा डोगर याच्यासोबत दूरदृष्य प्रणालीने संपर्कात होता. यामध्ये एके – ४७ आणि इतर आधुनिक शस्त्र शालमध्ये गुंडाळल्या अवस्थेमध्ये डोगर दिसत असल्याचे पुरावे पोलीसांना मिळाले होते. डोगरने पाकिस्तानकडून आवश्यक अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्यास सहमती दर्शवली. त्यानंतर हे शस्त्र खरेदी करण्यासाठी सुखा याने ५० टक्के आगाऊ आणि उर्वरित रक्कम शस्त्र भारतात मिळाल्यानंतर देण्याचे मान्य केले होते. सुखा हाच अभिनेता सलमान खानला संपवण्याचा कट रचून संपूर्ण कट रचण्यासाठी मारेकऱ्यांना आर्थिक मदत करत होता. ही रक्कम सुखा याला कोण देणार होते. त्याने शस्त्र खरेदी केली का, या सर्व प्रश्नांची उत्तरे पनवेल पोलिसांना सुखाकडून मिळवायची असल्याने पोलीस सुखा याच्या मागावर होते.
आधुनिक शस्त्रांसह सलमानला मारण्यासाठी खरेदी करण्यापूर्वीच अजय कश्यप आणि इतर आरोपींना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली. मागील अनेक महिन्यांपासून तो फरार होता.