उरण : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे समुद्राच्या भरतीपासून संरक्षण करणारी बांधबंदिस्ती कमजोर झाली आहे. या नादुरुस्त बांधाना समुद्राच्या भरतीच्या वेळी भेगा (खांडी) जाऊन येथील भात शेतीत पाणी शिरू लागले आहे. याकडे शासनाच्या खार बंदिस्तीकडे खारलँड विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे जमिनी नापिकी होण्याची शक्यता वाढली आहे. या बांधालगतच्या दोन हजार हेक्टर जमिनी धोक्यात आल्या आहेत. या जमिनीचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
उरण तालुका हा शेतीसाठी प्रसिद्ध होता. मात्र गेल्या पन्नास वर्षांत हजारो एकर जमिनी केंद्र व राज्य सरकारच्या औद्योगिक प्रकल्प, बंदर आणि खासगी उद्योग यासाठी जमिनी संपादीत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उरणमधील शेतीखालील जमिनी कमी झाल्या आहेत. असे असले तरी उरणच्या नागाव,केगाव व चाणजे तसेच उरण पूर्व विभागातील खोपटे, कोप्रोली, चिरनरे, आवरे, गोवठाणे, वशेणी, पुनाडे, धुतुम, बोरखार, मोठी जुई आदी खाडी किनारची जमीन भात पीकाखाली आहे. मात्र या जमिनीच्या परिसरात येणाऱ्या समुद्राच्या भरतीच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी असलेल्या नैसर्गिक वाटा बंद किंवा बुजविण्यात येत आहेत. त्यामुळे शेतीच्या सुरक्षेसाठी बांधण्यात आलेले बांध नादुरुस्त होऊन भात शेतीत पाणी शिरू लागले आहे. यात खोपटे,मोठीजुई,बोरखार परिसरातील शेतीत पाणी शिरून शेतीचे नुकसान होत आहे.
हेही वाचा – चार नवीन स्मशानभूमींसाठी पनवेल महापालिकेचा १० कोटींचा निधी
या जमिनीचे समुद्राच्या भरतीच्या पासून संरक्षण करण्याची जबाबदारी खारलँड विभागाची आहे. उरण तालुका हा खारलँड विभागाच्या पेण परिक्षेत्रात मोडतो. त्यामुळे या विभागाची जबाबदारी खारलँड विभागाची आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
उरण हे भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध होते. मात्र औद्योगिकीकरणामुळे शेतीचे प्रमाण घटले आहे. त्यात शिल्लक जमिनी या खारलँड विभागाच्या दुर्लक्षामुळे समुद्राचे पाणी शेतीत शिरत आहे. – संजय ठाकूर, शेतकरी कार्यकर्ते, खोपटे
उरणच्या आवरे, खोपटे ते बोरखार परिसरातील बांधबंदिस्ती सुस्थितीत आहे. काही प्रमाणात नादुरुस्त होत आहे. मात्र त्याची दुरुस्ती केली जात आहे. आवरे विभागातील दहा मीटर लांबीच्या बांधाच्या बंदीस्तीसाठी निविदा जाहीर करण्यात आली आहे. – अतुल भोईर, उपअभियंता, खारलँड विभाग