नवी मुंबई : भाजपसोबत बंडखोरी करत पक्षाच्या जवळपास २५ माजी नगरसेवकांना सोबत घेत बेलापूर विधानसभा मतदारसंघात मंदा म्हात्रे यांच्याविरोधात रणशिंग फुंकणाऱ्या संदीप नाईक यांना त्यांच्या जवळच्या शिलेदारांच्या प्रभागांमध्येच अपेक्षीत यश मिळाले नसल्याचे चित्र आता पुढे येत आहे. वाशी, बेलापूर, नेरुळ यासारख्या उपनगरांमध्ये महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते पद भुषविलेल्या अनेक तगड्या नेत्यांच्या प्रभागात नाईक यांना अपेक्षीत मतदान झाले नाही. दुसरीकडे स्थानिक नेत्यांची फौज पदरी नसतानाही मंदा म्हात्रे यांना भाजपचे कडवे मतदार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अहोरात्र घेतलेल्या मेहनतीमुळे विजय मिळवता आल्याचे आता स्पष्ट होत आहे.
बेलापूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळत नाही हे लक्षात येताच संदीप नाईक यांनी वाशीत निर्धार मेळावा आयोजित करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षात प्रवेश केला. हा प्रवेश करत असताना बेलापूर विधानसभा क्षेत्रातील भाजपचे माजी नगरसेवक तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांची फौज संदीप यांच्या मागे उभी राहीली. निवडणुकांना जेमतेम २५ दिवसांचा कालावधी शिल्लक असताना भाजप ते राष्ट्रवादी हा संदीप यांचा घाईघाईत झालेला प्रवास अनेकांना रुचला नाही. तरीही नाईकनिष्ठ नेते, पदाधिकाऱ्यांनी संदीप यांच्या बंडाला साथ दिली. वाशीतील निर्धार मेळाव्यात दशरथ भगत, संपत शेवाळे, भरत नखाते, अमित मेढकर, सुरज पाटील, रविंद्र इथापे यासारख्या प्रमुख नेत्यांनी खणखणीत भाषणे केली. यापैकी एखाद-दुसऱ्या नेत्याचा अपवाद वगळला तर इतरांना मात्र आपले प्रभावक्षेत्र असलेल्या प्रभागांमध्ये भाजपला रोखता आले नसल्याचे चित्र दिसून आले. विशेष म्हणजे, महाविकास आघाडीतून निवडणूक रिंगणात उतरताच उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काॅग्रेसला सोबत घेणाऱ्या संदीप यांना या पक्षाच्या नेत्यांच्या प्रभाव क्षेत्रातही फार मताधिक्य मिळाले नाही असे दिसून आले.
हेही वाचा…महेश बालदी यांनी पुन्हा जिंकले उरणच रण, मात्र नवख्या प्रीतम म्हात्रे यांचीही निकराची झुंज
भगत, शेवाळे, इथापे यथातथाच
संदीप यांच्या बंडामागे वाशीतील त्यांचे कडवे समर्थक दशरथ भगत आणि निशांत भगत या दोन काका-पुतण्याची साथ होती. वाशी आणि पाम बिच मार्गावरील तीन प्रभागांमध्ये भगत कुटुंबियांचा प्रभाव आहे. त्यामुळे संदीप यांच्या प्रचाराची धुरा या दोघांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. या प्रभागांमध्ये संदीप नाईक यांना मोठे मताधिक्य मिळेल अशी आशा व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात मात्र फशीबाई करसन भगत यांच्या वाशीगाव प्रभागात ४२ मतांचे मताधिक्याचा अपवाद सोडला तर भगत कुटुंबियांना संदीप यांच्यासाठी फार मताधिक्य देता आले नाही हे आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे. वैजयंती दशरथ भगत यांच्या प्रभाग क्रमांक ७७ मधून मंदा म्हात्रे यांना ७२६ तर रुपाली निशांत भगत यांच्या ७८ क्रमांकाच्या प्रभागातून १२० मतांनी संदीप पिछाडीवर राहीले. वाशीतील संपत शेवाळे यांच्या प्रभागात १११५, अंजली वाळुंज यांच्या प्रभागात ४३२, रविंद्र इथापे यांच्या नेरुळ येथील प्रभागात ५७४ तर डाॅ.जयाजी नाथ यांच्या प्रभागात ५७२ मतांची पिछाडी संदीप यांना सहन करावी लागली. वाशीत संदीप यांच्यासोबत प्रचारात उतरलेले वैभव गायकवाड यांच्या प्रभागात ८१७ मतांनी पिछाडी राहीली. गणेश म्हात्रे (६६८), पूनम पाटील (९२४) यांच्या प्रभागातील पिछाडी संदीप यांच्या पराभवाचे कारण ठरली. नाईक कुटुंबियांच्या कट्टर समर्थक समजल्या जाणाऱ्या माजी स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के यांना जेमतेम ३३ मतांची आघाडी संदीप यांना देता आली. ही सर्व मंडळी संदीप यांच्या प्रचारात अग्रभागी होती. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असलेले माजी उपमहापौर अशोक गावडे यांच्या प्रभागात ५७८ आणि ५३६ मतांची मोठी पिछाडी संदीप यांना सहन करावी लागली.
हेही वाचा…वाशी, बेलापूरने भाजपला तारले चुरशीच्या लढतीत संदीप नाईक यांचा थोडक्यात पराभव
नेरुळकर मात्र जोरात
संदीप नाईक यांनी भाजपपुढे उभ्या केलेल्या आव्हानात त्यांना तुर्भे तसेच नेरुळ विभागांची मोठी साथ लाभल्याचे पहायला मिळते. तुर्भे आणि कोपरी शहराचा भाग मिळून बनलेला ५७ क्रमांकाच्या प्रभागात संदीप यांना ४६२ मतांची आघाडी मिळाली. तुर्भे झोपडपट्टी भागात अमित मेढकर (१३५२), मुद्रिका गवळी (६७२), कविता आगोंडे ( ४७२), सुजाता सुरज पाटील (८३५), नामदेव भगत (११०८), गिरीश म्हात्रे (१३०९) या माजी नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये संदीप यांनी मोठी आघाडी घेतली. सुनीता मांडवे (४८८), जयश्री ठाकूर (४३५) या नेरुळकरांनीही संदीप यांना चांगली साथ दिली.
संघशक्ती विरुद्ध नाईक प्रभावाची निवडणूक
बेलापूर विधानसभा क्षेत्रात जवळपास प्रत्येक प्रभागात गणेश नाईक यांना मानणारे प्रभावी नेते आहेत. त्यामुळे निवडणुक अथवा मतदानाच्या दिवशी नाईक यांच्या बुथवर मोठी गर्दी दिसून येत होती. कार्यकर्ते, नेत्यांची मोठी फळी त्यांच्याकडे होती. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नियोजनबद्ध यंत्रणा आणि भाजपचे कडवे मतदार ही आमच्यासाठी जमेची बाजू होती. या मतदारांनी आम्हाला साथ दिली.
वरिष्ठ पदाधिकारी, भाजप