अडीच वर्षांत उद्यानाची दुरवस्था, तैलचित्र आणि सामग्रीची नासधूस
ठाणे-बेलापूर मार्गावरील दिघा परिसरात विभाग कार्यालयानजीक अडीच वर्षांपूर्वी पालिका निवडणुकीच्या तोंडावर अपुऱ्या अवस्थेत असलेल्या साने गुरुजी बालोद्यानाचे लोकार्पण करण्यात आले होते. मात्र, अवघ्या अडीच वर्षांत या बालोद्यानातील तैलचित्र तसेच इतर साधनांची मोठय़ा प्रमाणावर नासधूस झाली आहे.
दिघा तलावानजीक एमआयडीसीच्या जागेवर महापालिकेच्या माध्यमातून २ कोटी ६० लाख रुपये खर्चून साने गुरुजी बालोद्यान उभारण्यात आले आहे. या उद्यानामध्ये लहान मुंलासाठी मिनी ट्रेन, सानेगुरुजींच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी श्यामच्या आईचे तैलचित्र, आगरी कोळी बांधवाचे ओळख असणारे तैलचित्र त्याचबरोबर इतर खेळण्याच्या सुविधा व आसनव्यवस्था करण्यात आली होती. ८ मार्च २०१५ रोजी या उद्यानाचे उद्घाटन झाले.
मात्र अवघ्या अडीच वर्षांतच या उद्यानाची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी बसवण्यात आलेल्या खेळण्याचे साहित्य तुटलेल्या अवस्थेत आहे. तर झाडांना बसवण्यात आलेले आणि आसनव्यवस्थेचे कठडे यांना तडे गेले आहेत.
उद्यानाची ओळख असणाऱ्या प्रवेशद्वारावरील फलक उन्मळून पडले आहे. उद्यानातील आधुनिक पद्धतीचे दिवे, पदपथावरील अकर्षक सजावटीचे विद्युत पोल मागील अनेक महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळेला चंद्रप्रकाश तसेच मोबाइल टॉर्चचा आधार घेऊन बच्चेकंपनीसह पालकांना उद्यानात फिरावे लागत आहे. येथील मिनी ट्रेनसाठी ५ रुपये शुल्क आकरले जाते.
शालेय दिवसात व सुट्टीच्या दिवशी मोठय़ा प्रमाणावर गर्दी होत असल्याने या मिनी ट्रेनमुळे आर्थिक उत्पन्नही मिळत होते. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे मागील सहा ते सात महिन्यांपासून मिनी ट्रेन बंद आहे. २ कोटी ६० लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेले उद्यान देखभाली अभावी गैरसोयीच्या विळख्यात सापडले आहे.
तलावाची सजावट कुठे गेली?
दिघा परिसराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या या उद्यानात कारंजे, बोटिंगची सुविधा आणि इतर सजावटींचे नियोजन करण्यात आले होते. मात्र अडीच वर्षांत या नियोजनाबाबत काहीही हालचाल करण्यात आलेली नाही. सुरक्षचे कारण पुढे करीत बसवण्यात आलेल्या सुरक्षा जाळ्या सुस्थितीत असतानादेखील नवीन लोखंडी जाळ्या बसवण्याचा घाट घालण्यात आला होता.
शौचालय व सुरक्षेचा अभाव
दिघा व आजूबाजूच्या परिसरातील नागरिक तसेच विद्यार्थी मोठय़ा प्रमाणावर या उद्यानात येतात. त्याच्यां सोयीसाठी सुलभ शौचालय नियोजित करण्यात आले होते. तत्कालीन आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी शौचालयासाठी जागा उपलब्ध करून दिल्यांनतरही पालिकेतर्फे या ठिकाणी शौचालय बांधण्यात आले नाही. त्यामुळे महिलांची व लहान मुलांची गैरसोय होते आहे.
दिघा परिसरातील साने गुरुजी बालोद्यानाच्या असुविधांबाबत संबंधित अंभियंता आणि देखभाल कर्मचारी यांच्याकडून माहिती घेण्यात येईल. त्यानुसार तुटलेल्या साधनांची दुरुस्ती करण्यात येईल. ‘टॉय ट्रेन’देखील लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
– तुषार पवार, उपायुक्त, उद्यान विभाग, नवी मुंबई महानगरपालिका