नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींकरीता ‘आरोग्य हिताय’ या उपक्रमांतर्गत प्रायोगिक तत्त्वावर ‘सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशीन’ बसविण्यात आले आहे. रबाळे येथील राजर्षी शाहू महाराज विद्यालयात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांच्या हस्ते झाला. ‘आरोग्य हिताय’ उपक्रमाला मिळालेले यश पाहता अशा स्वरूपाच्या मशीन शाळांमध्येही लवकरच बसविण्यात येतील, असे महापौरांनी सांगितले. या वेळी अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण उपस्थित होते.
योग्य वयात मुलींना मासिक धर्माविषयी माहिती मिळणे आवश्यक असते. या काळात आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबरोबरच मासिक पाळीविषयी असलेले अपसमज आणि अंधश्रद्धा दूर करता आल्या पाहिजेत, असे ‘एजीएस’ या स्वयंसेवी संस्थेच्या समुपदेशक सारिका गुप्ता यांनी सांगितले. या वेळी गुप्ता यांनी ‘सेफ अ‍ॅण्ड हॅप्पी पीरिअड’ या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. परिसंवादात आठवी आणि नववीच्या विद्यार्थिनींनी त्यांच्याशी संवाद साधला.
शाळेत बसविण्यात आलेल्या मशीनमधील एका नॅपकीनसाठी विद्यार्थिनीला दोन रुपये द्यावे लागणार आहेत. एका मशीनमध्ये ४० पॅडची क्षमता आहे.

Story img Loader