वाशी विभागातील नागरिकांनी दाखविला स्वच्छतेचा आदर्श

नवी मुंबई : ‘स्वच्छतेसाठी पुढाकार नागरिकांचा, आजचा दिवस स्वच्छताकर्मींच्या सन्मानाचा’, म्हणत आज वाशी विभाग कार्यक्षेत्रातील तब्बल २ हजारहून अधिक नागरिकांनी रस्त्यावर उतरून आपापल्या क्षेत्रातील स्वच्छतेची जबाबदारी स्वतः झाडू हातात घेत पार पाडली आणि आपल्यातील स्वच्छताप्रेमाचे व संवेदनशीलतचे प्रत्यक्ष दर्शन घडविले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज रविवारची सकाळ. सार्वजनिक सुट्टीचा दिवस. नेहमीची कामे आरामात करण्याचा, उशीरा उठण्याचा. पण वाशीतील नागरिकांनी आज काहीतरी वेगळे करण्याचे ठरविले. त्यांनी शहर स्वच्छतेसाठी दररोज लवकर उठून आपले कर्तव्य बजावणाऱ्या स्वच्छताकर्मींनाच एक दिवस सुट्टी देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करायचे निश्चित केले. सकाळी ६.३० वाजल्यापासून वाशी विभागातील विविध परिसरात रस्ते, पदपथ झाडताना व तो कचरा गोळा करताना उत्साही नागरिक रस्त्यारस्त्यावर दिसू लागले.

विविध कामांसाठी घराबाहेर पडलेल्या इतर नागरिकांना काहीजण रस्ते झाडताना पाहून स्वच्छतेचा एखादा उपक्रम राबविला जात असेल असे वाटले. पण वाशीत सगळीकडे हेच चित्र दिसू लागल्यावर मात्र लोकांच्या लक्षात येऊ लागले की, ही हे नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे आहे. बघता बघता वाशी विभाग स्वच्छ झाला आणि लोकसहभागातून किती मोठे काम उभे करू शकते याचे प्रत्यक्ष दर्शन नवी मुंबईकरांनी घेतले.

यासोबतच रोजच्या स्वच्छता कामापुरती कामगारांना सवलत देत त्यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन नमुंमपा शाळा क्र. २८ सेक्टर १५ येथे करण्यात आले होते. तत्पूर्वी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वच्छता कामगारांनी एकत्र जमत तेथून सेक्टर १४ वाशी येथील जुने विभाग कार्यालय मार्गे शाळेपर्यंत जनजागृतीपर रॅली काढून स्वच्छता संदेशाचे प्रसारण केले. रॅलीच्या मार्गात नागरिकांनी ठिकठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहत स्वच्छता कामगारांच्या कार्याला मानवंदना दिली. रॅलीतील ओला, सुका व घातक या कचरा वर्गीकरणाचा संदेश प्रसारित करणाऱ्या मॅस्कॉटनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली, नवी मुंबई महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे  नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे यांनी २ दिवसात या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सुयोग्य नियोजन केले. त्यांनी वाशी विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी  दत्तात्रय घनवट तसेच मुख्य स्वच्छता अधिकारी  राजेंद्र सोनावणे व आपल्या सहकाऱ्यांसह वाशी विभाग कार्यक्षेत्रातील विविध स्वयंसेवी संस्था, स्वच्छताप्रेमी जागरूक नागरिक यांना एकत्र आणून लोकसहभागातून एक आगळावेगळा व भव्य उपक्रम यशस्वी केला. परिमंडळ १ विभागाचे उपआयुक्त  दादासाहेब चाबुकस्वार यांनीही यामध्ये सक्रिय सहभाग नोंदविला.

स्वच्छता अधिकारी व पदाधिकारी सुधीर पोटफोडे यांनी या संपूर्ण उपक्रम आयोजनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्यासह  विविध स्वच्छता निरीक्षक  यांनी क्षेत्रीय पातळीवर सर्वांना एकत्र करून ही संकल्पना यशस्वी करून दाखविण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. या उपक्रमात वाशी विभाग कार्यक्षेत्रातील विविध घटक, संस्था,शाळा, महाविद्याय  विविध संस्थांच्या पदाधिकारी, सदस्यांनी स्वयंस्फुर्तीने सहभागी होत ‘ माझा कचरा, माझी जबाबदारी’ हे घोषवाक्य स्वच्छता कामगारांना एक दिवस त्यांच्या कामापासून सुट्टी देत, एवढेच नव्हे तर त्यांचे काम स्वतः करीत प्रत्यक्ष कृतीतून सिध्द करून दाखविले.  

या माध्यमातून स्वच्छता कामगार रोज कोणत्या परिस्थितीत आणि वातावरणात काम करतात याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही घेतला अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत अनेक नागरिकांनी यामुळे आमचा या स्वच्छताकर्मींकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला असल्याची भावना व्यक्त केली.स्वच्छ सर्वेक्षणामध्ये दरवर्षी महानगरपालिकेला मिळणाऱ्या मानांकनात सर्वात मोठा वाटा या स्वच्छताकर्मींचा असतो म्हणून त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी त्यांचे काम आम्ही करून त्यांच्या सेवाभावी कार्याला सलाम करण्याचे ठरवले अशी प्रतिक्रिया स्वच्छता कार्यात सहभागी नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली. या स्वच्छताकर्मी सन्मान उपक्रमांतर्गत २०० हून अधिक स्वच्छताकर्मींची नमुंमपा शाळा क्र. 28, सेक्टर १५, वाशी येथे आरोग्य तपासणी करण्यात आली. हार्ट फाऊंडेशनच्या सहयोगाने, मेडिकव्हर हॉस्पिटल व ड्रीम ऑप्टिक्स यांच्या माध्यमातून आयोजित या शिबिरात स्वच्छताकर्मींची रक्तदाब तपासणी, मधुमेहासाठी रक्ततपासणी, बी.एम.डी. तपासणी, नेत्रतपासणी, ई.सी.जी. अशा विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. याकरिता हार्ट फाऊंडेशनचे प्रमुख डॉ. ईलीस जयकर यांचे मौलिक सहकार्य लाभले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanitation workers spontaneously handed navi mumbaikars ideal cleanliness shown by the citizens ysh