सानपाडा
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पश्चिम बाजूच्या खाडीकिनाऱ्यापर्यंत सानपाडय़ाची सीमा. सानपाडा गावाच्या नावाची उपपत्ती कशावरून झाली याची नेमकी माहिती उपलब्ध नाही; या गावच्या उत्तरेस अडीच एकर जागेवर दत्तमंदिर आहे.
पामबीच मार्गाची सुरुवातच सानपाडा गावाने होते. पश्चिम बाजूच्या खाडीकिनाऱ्यापर्यंत या गावाची सीमा पसरल्याने खाडीवर जाण्यास तयार झालेल्या पायवाटेवरून पामबीच मार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. सानपाडा हे नाव कशावरून पडले याची माहिती उपलब्ध नाही, पण पंचक्रोशीत या गावाच्या उत्तर बाजूस अडीच एकरांवर असलेले सर्वात विस्तीर्ण परिसर असलेल्या दत्तगुरूंच्या पादुकांचे मंदिर हीच या गावाची खरी ओळख. तीन बाजूंनी मिठागरे आणि एका बाजूला जंगल अशी निसर्गसंपदा असलेले हे बेलापूर पट्टीतील गाव तसे स्वयंपूर्ण. विस्तीर्ण अशा मिठागरात पिकणारे मीठ पनवेल-ठाणे बाजारपेठेत विकावे आणि शेती, मासेमारी करून उदहनिर्वाह करावा, अशी या गावातील ग्रामस्थांची दैनंदिनी. दत्तगुरूंच्या जयंतीला निघणारी गावातील पालखी हा सर्वात मोठा उत्सव. या उत्सवाला केवळ गावातीलच नाही; पण आजूबाजूच्या सर्व गावांतील गावकरी आजही आवर्जून हजेरी लावतात. या दिवशी सुरू झालेली संपूर्ण गाव उपवासाची परंपरा आजही कायम असून दर गुरुवारी गावात मांसाहर वज्र्य आहे. जणू काही सर्व गावाचा एकाच दिवशी उपवास करण्याची एक सवयच गावकऱ्यांनी आजही टिकवून ठेवली आहे. राजकीय पादत्राणे गाव विकासाच्या आड येऊ न देता सर्वपक्षीय ग्रामस्थ एकत्र आहेत. दत्तगुरूंवर अपार श्रद्धा असलेले गावकरी कोणत्याही शुभकार्याची सुरुवात या दत्तगुरूंच्या दर्शनाने करीत असतात. विशेष म्हणजे या दत्तगुरूंच्या मंदिरात दर गुरुवारी महाप्रसाद ठेवला जातो आणि तो देण्यासाठी वर्षांनुवर्षे नाव नोंदणी करावी लागते.
शीव-पनवेल मार्गाला वाशी गाव उलटल्यानंतर या सानपाडा गावाची उत्तर शीव लागते. सध्याच्या तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यापर्यंत या गावाची हद्द असून या ठिकाणी असणारी जंगलसंपत्ती याच गावच्या मालकीची मानली गेली आहे. त्यामुळे १९६० च्या दशकात नवी मुंबईत एमआयडीसी आल्यानंतर सुरू झालेल्या हार्डिलिया, फायझर या बडय़ा रासायनिक तसेच आयुर्वेदिक कंपन्यांत ग्रामस्थांना नोकरीची संधी प्राप्त होऊ शकली. त्यामुळे अर्धे गाव या कंपन्यात नंतर कामाला लागले. पश्चिम आणि दक्षिण बाजूस असलेल्या दोन हजार एकरांवरील मिठागरांमुळे अनेक ग्रामस्थ या मिठागरात घाम गाळत होते. त्यामुळे मीठ हे या गावाचा अविभाज्य घटक झाला होता. ठाकूर, पाटील, दळवी, मढवी, वास्कर नावाच्या ३० ते ४० कुटुंबाच्या विस्तारातून या गावाची सध्याची लोकसंख्या दोन हजारांच्या घरात पोहोचली आहे. इतर कोणत्याही जाती-जमातीची लोकसंख्या नसलेले हे गाव शंभर टक्के आगरी समाजाचे आहे. गावातील दत्तगुरूंच्या पादुका या जागृत देवस्थान मानले जाते. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात होणारी गावची यात्रा ही लक्षवेधी ठरते. या मंदिराबरोबरच विठ्ठल रखुमाई, श्री शंकर, मरीआईचे गावात मंदिर आहे. दत्तगुरूंच्या मंदिरात आजही महिलांना प्रवेशबंदी आहे. महिलेमुळे मंदिरासमोर असलेला पिण्याच्या पाण्याचा झरा गायब झाल्याने महिलांना शेकडो वर्षांपूर्वी या मंदिरात प्रवेशबंदी करण्यात आल्याची दंतकथा आहे. गावात होणारी मार्गर्शीष महिन्यातील यात्रा आणि दत्त जंयती, हनुमान जयंती हे गावाचे प्रमुख उत्सव मानले जातात. या निमित्ताने गावात निघणारी पालखी हे संपूर्ण पंचक्राोशीतील गावकऱ्यांसाठी एक आकर्षण मानले गेले आहे. होळीचा मान पाटलाचा, ही परंपरा आजही पाळली जात आहे. १९२० पासून बाळा पोशा पाटील आणि पांडुरंग बाळा पाटील यांनी ही पोलीस पाटलाची धुरा पोलीस आयुक्तालय अस्तित्वात येईपर्यंत यशस्वी सांभाळली. गावातील वाद-विवाद, तंटा या पोलीस पाटलांच्या मध्यस्थीने सोडविले जात होते. स्वातंत्र्यानंतर गावात चौथीपर्यंत शाळा सुरू झाली. त्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी तुर्भे येथील सामंत विद्यालयावर गावातील तरुणांचा भर होता.
सानपाडा सेक्टर सातमध्ये पालिकेने एक विस्तीर्ण आणि सुंदर असे उद्यान विकसित केले आहे. त्याला पहिले नगरसेवक बाळाराम पाटील यांनी सीताराम मास्तर असे नाव दिले आहे. या सीताराम मास्तरांचे नाव आजही गावात आदराने घेतले जाते. गावातील पहिले शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून त्यांची ओळख आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले सीताराम मास्तर एक चांगले नाटककार, पेटीवादक आणि नट होते. त्यामुळे गावातील एक प्रतिभावंत आसामी म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून शंकर मढवी यांनी भजन-परंपरा कायम ठेवली. हार्डिलिया कंपनीच्या मागे असलेले कुकशेत गाव जे नंतर कंपनीच्या घातक प्रदूषणापासून सुटका व्हावी म्हणून नेरुळ येथील एमआयडीसीच्या जागेत स्थलांतरित करण्यात आले ते गाव आणि सानपाडा यांची एक गावाची एक ग्रुप ग्रामपंचायत होती. या ग्रामपंचायतीचे पहिले संरपंच म्हणून काशिनाथ पाटील यांनी राजकीय प्रवेश केला.
मिठाच्या टोपल्या घेऊन ग्रामस्थ ठाणे व पनवेल येथील खाडी पार करून विक्रीसाठी जात होते. त्याच ठिकाणाहून माहिन्याभराचा बाजारहाट आणला जात होता. प्रवासासाठी बेलापूरहून सकाळ-संध्याकाळ सुटणाऱ्या एका एसटी ग्रामस्थांना अवलंबून राहावे लागत होते. मिठागराच्या जमिनीवर कूळ म्हणून अनेक ग्रामस्थांची नावे होती, पण त्याचा मोबदला ग्रामस्थांना मिळाला नाही. त्याचा मोबदला मिठागराच्या मालकांनी हडप केला. सिडकोच्या गावठाण विस्ताराला अनुकूल प्रतिसाद देणारे हे पंचक्रोशीतील तसे पहिले गाव आहे. त्यामुळे नागरीकरण झाल्यानंतरही गावात काही अपवाद वगळता ये-जा करण्यास मोकळी जागा सोडण्यात आली आहे. त्यामुळे गाव नागरीकरणाच्या धबगडय़ात हरवून गेले असले तरी थोडे नियोजनबद्ध असल्यासारखे वाटते. गावाच्या एका कोपऱ्यातील विहिरीजवळ एक दुसरी वसाहात वसविण्यात आली होती. पिंपळपाडा नावाच्या या लोकवसाहतीचेही एक अस्तित्व आजही कायम आहे. १९६५ च्या सुमारास गावात वीज आणि पाणी योजना अस्तित्वात आल्याने गावात सुधारणा झाल्या. याच काळात आलेल्या औद्योगिक वसाहतीमुळे गावाचा नंतर विकास होऊ शकला. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात गावाचे नाव उज्ज्वल करणारा मात्र गावात कोणी नसल्याची खंत ग्रामस्थांना आहे.