नवी मुंबई पालिकेचे महत्त्वपूर्ण स्थायी समिती सभापतिपद शिवसेनेला बहाल करण्यात निर्णायक भूमिका बजावणारे माजी नगरसेवक व काँग्रेसचे सरचिटणीस संतोष शेट्टी यांना येत्या काळात स्वीकृत नगरसेवक म्हणून पालिका सभागृहात घेण्याचे आश्वासन शिवसेनेने दिले आहे. त्यामुळे तीन वेळा नगरसेवकपदाची हॅट्ट्रिक साधणारे शेट्टी शिवसेनेच्या पाठिंब्यावर चौथ्यांदा सभागृहात येण्याची शक्यता आहे.
१११ नगरसेवक संख्या असलेल्या पालिकेत एकूण पाच स्वीकृत नगरसेवक असून ही संख्या गेली २० वर्षे कायम आहे. मुंबई प्रांतिक अधिनियमात केवळ पाच नगरसेवकांना सभागृहात स्थान देण्यात आले असून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांना स्थान द्यावे असे अभिप्रेत आहे; पण हे नगरसेवकपद प्रत्येक पक्ष दुर्लक्षित कार्यकर्त्यांना देऊन त्यांची सोय करीत असल्याचा अनुभव आहे. सध्या राष्ट्रवादीच्या संख्याबळानुसार तीन आणि युतीचे दोन स्वीकृत नगरसेवक आहेत. काँग्रेस पक्षाचा पक्षादेश असताना नगरसेवकपद पणाला लावून पाटील यांनी शिवसेनेला मतदान केले आहे. शेट्टी यांच्या या उपकाराची परफेड म्हणून त्यांना सभागृहात पुन्हा आणण्याचे आश्वासन शिवसेनेने दिले आहे. महापौर निवडणुकीत शेट्टीसारख्या मुत्सद्दी नगरसेवकाची गरज असल्याचे ओळखून सेना दोन स्वीकृत नगरसेवकांपैकी एकाला राजिनामा देण्यास भाग पाडणार असल्याचे समजते. शिवसेनेचे सध्या ऐरोलीतील मनोज हळदणकर व तुर्भे येथील राजेश शिंदे हे दोन स्वीकृत नगरसेवक असून यापैकी एकाला नारळ दिला जाणार आहे. शिवसेनेचे सभागृहातील संख्याबळ ४६ असल्याने त्यांचे दोन स्वीकृत नगरसेवक सभागृहात आहेत. काँग्रेस व भाजपचे अनुक्रमे दहा व पाच नगरसेवक असल्याने या पक्षाचा एकही नगरसेवक स्वीकृत सदस्य म्हणून नाही. त्यामुळे शेट्टी यांना शिवसेनेच्या पांठिब्यावर सभागृहात पाठविण्याची व्यहूरचना आखली जात आहे. त्यासाठी लागणाऱ्या दहा-बारा नगरसेवकांचे संख्याबळ शेट्टी यांच्या मागे शिवसेना उभी करणार असून याला सेनेच्या बडय़ा नेत्यांचा हिरवा कंदील आहे. सध्या राष्ट्रवादीला सभागृहात विरोधी पक्षनेते विजय चौगुले, नामदेव भगत, किशोर पाटकर, एम. के. मढवी, शिवराम पाटील हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी व काँग्रेसचे नगरसेवक चांगलेच जेरीस आणत आहेत. शेट्टी यांची सभागृहातील उपस्थिती यापूर्वी लक्षवेधी राहिली असल्याने अस्खलित मराठीत ते नेहमीच सत्ताधारी पक्षाची लक्तरे काढताना दिसले आहेत. त्यामुळे सभागृहातील या पाच पांडवाच्या साथीला आता संतोष शेट्टी ऊर्फ आण्णा यांची मदत होणार आहे. त्या तुलनेत राष्ट्रवादीचे नगरसेवक विरोधकांवर तुटून पडताना दिसत नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा