पनवेल : पनवेल शहरातील एका सराफाने १७ गुंतवणूकदारांची तब्बल साडेसहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याबाबत तक्रारदारांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे अर्ज केल्यावर या गुन्ह्याला वाचा फुटली. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीच्या गुन्ह्यासह महाराष्ट्र गुंतवणूकदार आणि ठेवीदारांचे संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हेही वाचा – Navi Mumbai मधील ड्रग्ज तस्करीचं जाळं उद्ध्वस्त, टोळीच्या म्होरक्याला NCB कडून अटक

हेही वाचा – Uran Assembly Constituency : जयंत पाटलांच्या पराभवामुळे उरणचा पेच

पनवेल शहरातील कापड गल्ली येथील डी. एम. कोठारी ज्वेलर्स या सराफाच्या दुकानामध्ये सप्टेंबर २०१९ ते नोव्हेंबर २०२३ या दरम्यान सोने खरेदीविक्रीच्या व्यवहारामध्ये गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी दर महिन्याला अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष देण्यात आले. रोख रकमेतून आणि बॅंक खात्यातून गुंतवणूकदारांनी तब्बल ६ कोटी ५७ लाख ३६ हजार रुपयांची गुंतवणूक केली. काही महिन्यांनी गुंतवणूकदारांनी नफ्याची मागणी केल्यावर त्यांना मुद्दलसुद्धा परत न दिल्याने गुंतवणूकदारांनी पोलिसांत धाव घेतली. पनवेल शहर पोलीस ठाण्यात याबाबत सराफ मित्तल कोठारी, दिलीप कोठारी, लता कोठारी, प्रिती कोठारी यांच्याविरोधात गुन्हा नोंदविल्यानंतर नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांच्या नेतृत्वाखाली सराफ व त्याच्या सहकाऱ्याची चौकशी सुरू झाली आहे.