स्वच्छ शहर अभियानात देशात तिसरा क्रमांक पटकावून नावलौकीकात सातत्य राखणाऱ्या नवी मुंबई महापालिकेने चक्क वीजबिलातही बचतीसाठीचा श्रीगणेशा केला आहे. तोही आपल्या घरापासूनच म्हणजेच पालिका मुख्यालयापासून. आतापर्यंत नवी मुंबई महापालिका मुख्यालयाचे बिल महिना ३५ ते ३६ लाखापर्यंत येत होते. त्यामुळे पालिकेने सीएफएल प्रकारच्या लाईट बदलून पालिका मुख्यालयात एलईडी दिवे लावले आहेत. त्यामुळे दरमहा ३५ ते ३६ लाखांचे बिल कमी होऊन महिना ६ लाखाची बचत होत आहे. त्यामुळे पालिकेने आपल्याच पालिका मुख्यालयापासून वीजबचतीचा श्रीगणेशा केला असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
हेही वाचा- यंदा द्राक्षे खाण्यासाठी वाट पाहावी लागणार, कारण…
नवी मुंबई शहराचा कारभार पामबीच मार्गालगतच्या आयकॉनिक असलेल्या देखण्या वास्तूत २० फेब्रुवारी २०१४ पासून झाला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विजेचा वापर केला जातो. संपूर्ण वातानुककुलित असलेल्या इमारतीत संपूर्ण पालिकेचा एकत्रित कारभार याच कार्यालयामध्ये चालतो. देखण्या व सर्वांचे आकर्षण असलेल्या या इमारतीत ४०० टनाचे दोन वातानुकुलित प्लांट आहेत. तसेच प्रत्येक कार्यालयात प्रशस्त प्रकाश व्यवस्था व वातानुकूलित यंत्रणा आहेत. या संपूर्ण इमारतीत ४८०० च्या पेक्षा अधिक वीजेसाठीच्या फिटींग लावलेल्या आहेत. याच मुख्यालयात आकर्षक व मोठा वीजेवर चालणारा झुंबरही आहे. तसेच पामबीच मार्गावर असलेल्या या देखण्या इमारत व तिथे असलेली प्रकाश व्यवस्था सर्वांचे लक्ष वेधून घेते. तसेच याच मुख्यालयाच्या इमारतीत राष्ट्रीय सण व इतर ठराविक दिनाला आकर्षक रोषणाई केली जाते. ती रोषणाई पाहाण्यासाठी लाखो नागरीक गर्दी करतात ,परंतू दैनंदिन कामकाज चालणाऱ्या या इमारतीमध्ये असलेल्या सीएफल फिटींगमुळे वीजबील अधिक येत होते. परंतू मागील काही महिन्यात याच इमारतीमधील सर्व वीजेच्या फिटींग या एलईडीच्या लावल्यामुळे दरमहा वीजबील ३६ लाखाहून आता २९ ते ३० लाखापर्यंत येत असल्याची माहिती पालिका विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील लाड यांनी दिली.
नवी मुंबई महापालिका मुख्यालयातील सर्व साध्या पध्दतीच्या फिटींग बदलण्यात आल्या असून एलईडी दिवे लावण्यात आले आहेत. त्यामुळे दरमहा येणाऱ्या बीलात दरमहा ६ लाखापर्यंत बचत होत आहे, अशी माहिती शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली.
पालिकेच्या सर्व कार्यालयातही एलईडी दिले लागणार…
नवी मुंबई महापालिका मुख्यालयात साध्या वीज फिटींगच्या ऐवजी एलईडी दिवे लावल्याने लाखो रुपयांची बचत होत असून वीजेचा वापर कमी होत आहे. त्यामुळे पालिकेची सर्व विभाग कार्यालये, सर्व नागरी आरोग्य केंद्र या बरोबरच पालिकेच्या शहरात सर्व ठिकाणी असलेल्या कार्यालयामद्ये एलईडी दिवे लावून वीजेच्या कमी वापराबरोबरच वीजबील येऊन बचत करण्यात येणार आहे.