मनपा रुग्णालयात औषधांचा तुटवडा; रक्त व अन्य तपासणी खासगी लॅबकडे
राज्यात अनेक ठिकाणी ‘स्वाइन फ्लू’ने डोके वर काढल्याने नवी मुंबई प्रथम संदर्भ रुग्णालयात यासाठी उपचार केंद्र स्थापन केले आहे. मात्र या कक्षाचा रुग्णांना उलटा ‘ताप’ वाढला आहे. ‘स्वाइन फ्लू’साठी साडेचार हजारांचे शुल्क उकळूनही उपचारांच्या नावाने बोंबच असल्याची तक्रार एका रुग्णाने केली आहे.
उपचार केंद्रात औषधांचा तुटवडा आहेच, शिवाय रक्त व अन्य तपासण्यांसाठी खासगी लॅबकडे पाठवले जात आहे. त्यामुळे मनपा रुग्णालय असूनही आर्थिक दुर्बल घटकांना त्याचा लाभ घेता येत नाही. आरोग्य विभागाचे अधिकारी मात्र अशी परिस्थिती नसल्याचे सांगत आहेत. कधी तरी प्रत्यक्ष भेट देऊ न पाहा, अशी आर्जव रुग्णांचे नातेवाईक करीत आहेत.
तीन हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असल्याची पाठ थोपटून घेणाऱ्या मनपाचा आरोग्य विभागच ‘सलाइन’वर असल्याचे समोर येत आहे. वाशीच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णांना बाहेरून औषध खरेदी करावी लागत आहे. केवळ औषधांचा तुटवडा हीच समस्या नसून येथील यंत्रणादेखील जुनाट झाल्याने तपासणीसाठी रुग्णांची परवड सुरू आहे.
आरोग्य विभागाचे वाभाडे काढणारी तक्रार नरेश कांबळे या रुग्णाने केली आहे. स्वाइन फ्लूसाठी साडेचार हजारांचे शुल्क घेऊनही उपचारांच्या नावाने येथे बोंब असल्याची तक्रार करण्यात आली आहे. येथील समस्यांमुळे चांगले काम करणारे डॉक्टर आणि कर्मचारीही त्रस्त आहेत. वरिष्ठ अधिकारी कानाडोळा करत असल्याने नाइलाज असल्याची खंत ते व्यक्त करीत आहेत.
लोकप्रतिनिधीही याकडे फारसे गांभीर्याने पाहात नाहीत. केवळ आपल्या प्रभागातील रुग्ण असेल तरच लक्ष घालतात. रक्त तपासणी हापकिनकडे करवून घेतो. ज्याला दोन दिवस लागतात. त्यासाठी कुठलेही शुल्क आकारले जात नाही. स्वाइन फ्लूसाठी औषधांचा तुटवडा नाही.
– दयानंद कटके, आरोग्य अधिकारी