उत्पादन अद्याप सुरू झाले नसल्याचा नवी मुंबई महापालिकेचा दावा
नवी मुंबई पालिकेच्या बालवाडी ते आठवीपर्यंतच्या शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणारे शालेय, स्काऊट व पीटी गणवेश, पावसाळी रेनकोट, दप्तर, वह्य़ा, बूट, मोजे, हे सर्व साहित्य हे गुणवत्तायुक्त आणि दर्जेदार असल्याचा दावा पालिकेच्या शिक्षण विभागाने केला आहे. त्यासाठी हे साहित्य शासनमान्य गुणवत्ता परीक्षण प्रयोगशाळेत तपासून दिले जात आहे. शिवसेना नगरसेवक किशोर पाटकर यांनी सभागृहात फडकविलेले दप्तर आणि रेनकोट यांची रंगसंगती आणि आकारमान भिन्न आहेत. यंदा देण्यात येणाऱ्या शालेय साहित्याची अद्याप उत्पादनच सुरू झालेले नाही, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नगरसेवकाने सभागृहात दाखविलेले दप्तर व रेनकोट हे केवळ सवंग प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट होता, असे पालिका अधिकाऱ्यांचे मत आहे. सदस्यांनी सभागृहात प्रशासनावर आरोप केल्यानंतर त्या आरोपांचे खंडन करण्याची संधी अधिकाऱ्यांना देण्यात यावी, अशी मागणीदेखील अधिकाऱ्यांनी केली आहे. सभागृहातील आरोपावर पालिकेकडून हा पहिल्यांदाच खुलासा करण्यात आला आहे.
नवी मुंबई पालिकेच्या सर्व शाळांमधील बालवाडी ते आठवीपर्यंतच्या ४१ हजार विद्यार्थ्यांना पालिकेच्या वतीने दरवर्षी शालेय साहित्याचे मोफत वाटप केले जाते. हे साहित्य वाटप करण्यासाठी दरवर्षी विलंब होत असल्याने पालिकेच्या शिक्षण मंडळाने यंदा साहित्य खरेदीचा प्रस्ताव दोन महिने अगोदर महासभेपुढे ठेवला. यात पुढील वर्षीचे साहित्य खरेदीचाही उल्लेख आहे. त्यामुळे एकूण विद्यार्थीसंख्या ८५ हजारच्या घरात गेली असून त्यासाठी ३० कोटी ७० लाख रुपये खर्च होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पालिका विद्यार्थ्यांना देणारे शालेय साहित्य हे निकृष्ट व दर्जाहीन असून ते बाजारभावापेक्षा चढय़ा दराने घेण्यात आले असल्याचा आरोप वाशीतील शिवसेना नगरसेवक किशोर पाटकर यांनी केला आहे.
पाटकर यांच्या आरोपानंतरही महापौर सुधाकर सोनावणे यांनी हा प्रस्ताव घाईघाईत मंजूर केला. त्या वेळी आरोपाचे खंडन करण्याची संधी शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिली नाही. त्यामुळे शिक्षण मंडळाने शुक्रवारी एक निवेदन प्रसिद्ध केले असून त्यात हे साहित्य दर्जेदार व गुणवत्तापूर्ण असल्याचा दावा केला आहे. शालेय साहित्यांची ई टेंडरिंगद्वारे निविदा मागविली जात असून यात देशातील नामांकित मफतलाल, रिलायन्स, सियाराम, टेक्सास, जेपी फूटवेअर यांसारख्या कंपन्या सहभागी होत असतात. ई टेंडरिंगमुळे ही निविदा पारदर्शक असल्याचा दावा केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘स्वस्ताईच आहे’
सभागृहात दाखवलेले रेनकोट हे ५०० रुपयांना घेतले नसून आकारमानाप्रमाणे ते २६९ ते ३४३ रुपयांना घेतले जाणार आहेत. दप्तराचीही किंमत बदलत आहे. पूरक पोषण आहारातील चिक्कीमध्येही बाजारभावापेक्षा १० ते १२ रुपये स्वस्ताई आहे, असे अधिकाऱ्यांनी या वेळी स्पष्ट केले.