नवी मुंबई : उन्हाळी सुट्टीनंतर गुरुवारी १५ जूनपासून शहरातील शाळांची घंटा वाजली असून नव्या उत्साहात शाळा सुरु झाल्या आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवसाचा उत्साह व आनंद विविध शाळांमध्ये पाहायला मिळाला.तर महापालिकेच्यावतीने शाळेच्या पहिल्याच दिवशी १ली ते ८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना राज्यशासनाकडून मिळालेल्या मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
महापालिकाक्षेत्रातील पालिकेच्या शाळांबरोबरच १ ली ते ८ वीच्या मान्यताप्राप्त शाळांना या पाठ्यपुस्तकांचे पालिकेच्याद्वारे वितरण करण्यात आले होते. तर नवी मुंबई महापालिकेच्या ९ वीच्या व १० वीच्या विद्यार्थ्यांना नवी मुंबई महापालिकेच्यावतीने मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात आले.समग्र शिक्षा अभियानाद्वारे शासनाकडून प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांना ही मोफत पुस्तके वाटप करण्यात आली असल्याची माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाने दिली आहे.
शाळेच्या पहिल्याच दिवशी नवी मुंबई महापालिकेच्यावतीने प्रवेशोत्सव तसेच स्वागतोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध विभागात स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.सकाळपासूनच शहरात शाळेच्या पहिल्या दिवसाची उत्सुकता पाहायला मिळाली. नवी मुंबई शहरात शाळेच्या पहिल्या दिवसाचा आनंद व उत्साह सर्व शाळाशाळांमध्ये पाहायला मिळाला. तर खासगी शाळांमध्येही शाळेच्या पहिल्या दिवसाचा आनंद विविध कार्यक्रमाद्वारे साजरा करण्यात आला.नवी मुंबई महापालिका क्षेत्रात विविध माध्यमाच्या शाळा चालवल्या जातात त्या सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा स्वागतोत्सव व प्रवेशोत्सव साजरा करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी अरुण यादव यांनी दिली.