|| शेखर हंप्रस
नवी मुंबईच्या सुरक्षा दलात दोन गस्ती नौकांची भर
नवी मुंबईच्या सागरी सुरक्षा दलाच्या ताफ्यात दोन गस्ती नौकांची भर पडली आहे. या दोन्ही नौका भाडे तत्त्वावर घेण्यात आल्या आहेत. संजीवनी आणि महालक्ष्मी अशी त्यांची नावे आहेत. त्यामुळे देखभाली अभावी नौका बंद पडल्यामुळे गस्त घालण्यात वारंवार येणारे अडथळे दूर होऊन सागरी किनारा अधिक सुरक्षित होण्याची चिन्हे आहेत.
नवी मुंबई, पनवेल आणि उरण लगत असलेल्या सागरी किनाऱ्याची सुरक्षा नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या शिरावर आहे. या परिसरात अद्याप दुर्घटना, अतिरेकी हल्ला वा घुसखोरी झाली नसली, तरीही कायम सतर्क राहावे, असे संवेदनशील ठिकाण म्हणून या परिसराची नोंद घेतली गेली आहे. येथून स्पीड बोटीने अवघ्या २० मिनिटांत मुंबईत जाता येते, त्यामुळे येथील सुरक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या पूर्वी सागरी सुरक्षा दलाकडे सहा सुरक्षा बोटी होत्या. त्यापैकी दोन बोटी अनेक वर्षे डागडुजी अभावी धूळखात पडून होत्या. त्यामुळे भाडय़ाने बोटी वा ट्रॉलर्स घ्यावे लागत. केवळ भाडे भरून अन्य खर्च कंत्राटदारावरच सोपवल्यास गस्तीमध्ये खंड पडणार नाही, या हेतूने राज्य सरकारने या दोन नौका भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत.
या दोन नौका गुरुवारपासून नवी मुंबईत कार्यरत झाल्या. त्यावेळी विशेष शाखेचे उपायुक्त पंकज डहाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पराग सोनावणे आणि अन्य १४ अधिकारी व ३० कर्मचारी उपस्थित होते. या ट्रॉलर्सवर सशस्त्र पोलिसांचे पथक तैनात असणार आहे.
नवी मुंबईच्या सागरी सुरक्षेसाठी सात स्पीड बोट असून त्यात या दोन गस्ती नौकांची भर पडली आहे. त्यामुळे अतिरेकी हल्ले, घुसखोरी तसेच अवैध वाळू माफियांवर नजर ठेवणे व त्वरित कारवाई करणे शक्य होणार आहे. – पंकज डहाणे, उपायुक्त, विशेष शाखा.
नौकांविषयी..
- नावे- संजीवनी आणि महालक्ष्मी
- रोजचे भाडे – १५ हजार रुपये
- रंग – सर्वसामान्य बोटींप्रमाणे
माग काढणे कठीण
नवी मुंबई पोलिसांच्या स्पीड बोटींना विशिष्ट रंग देण्यात आला आहे. त्यामुळे त्या पोलिसांच्या बोटी आहेत हे सहज ओळखता येते. मात्र या दोन गस्ती नौकांना असा विशेष रंग वा ओळख पटेल असे काहीही चिन्ह नसल्याने त्या पोलिसांच्या आहेत, हे ओळखणे शक्य नाही. नौकांमध्ये राहण्याची व शौचालयाची सुविधा असून खोल समुद्रात जाण्याची क्षमता त्यांच्यात असल्याने माग काढणे वा पाठलाग करणे शक्य होणार आहे. या नौकांचे रोजचे भाडे सुमारे १५ हजार रुपये असून यात देखभाल दुरुस्ती आणि इंधन खर्चाचाही समावेश आहे.