उरण : समुद्राच्या उधाणाने खोपटे ते आवरे परीसरातील बंदिस्ती फुटली आहे. त्यामुळे येथील शेकडो एकर पिकलेल्या भात शेतीत खारे पाणी शिरून शेतीचे नुकसान झाले आहे. यामध्ये पिरकोन,आवरे, गोवठणे, बांधपाडा (खोपटा) ग्रामपंचायत हद्दीतील पारंगी, सांग पाले खार, काशी, पारंगी, रेवचा वळा खार या खाडीकिनाऱ्यावरील बांधबंदिस्ती समुद्रातील उधाणाच्या पाण्यात उद्ध्वस्त झाली आहे. पावसाच्या पुराने तर आता समुद्राच्या कहराने शेतकऱ्यांवर ओढवलेल्या नापिकीच्या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
उरण हा अरबी समुद्राच्या कुशीत खाडी किनाऱ्यावर वसलेला तालुका आहे. त्यामुळे येथील बहुतांश शेतकरी हे खाडी किनाऱ्यावरील शेती करीत आहेत. मात्र या परिसरात होणाऱ्या औद्योगिकरणामुळे मिठाचा व्यवसाय संपुष्टात आला आहे. त्यात खारलँड विभागाने उरण तालुक्यातील खाडीकिनाऱ्यावरील बांधबंदिस्तीच्या मजबुतीची कामे न केल्याने भात शेतीचे संरक्षण करणारी बांधबंदिस्ती उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे समुद्रातील खारे पाणी हे शेत जमिनीत शिरून पिरकोण, आवरे, गोवठणे, बांधपाडा (खोपटा) ग्रामपंचायत हद्दीतील पारंगी, सांग पाले खार, काशी, पारंगी, रेवचा वळा खार या परिसरातील हजारो एकर भात शेती नापीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तरी शासनाने पुढाकार घेऊन भात शेती वाचविण्यासाठी बंदिस्तीचे मजबुतीकरण करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा – नवी मुंबईत पुन्हा पाणी गळती, आज संध्याकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार
१९ जुलैच्या पुराचा तडाखा हा तालुक्यातील २३ ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना तसेच भात शेतीला मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्यात उरण पूर्व विभागातील पिरकोन, आवरे,गोवठणे, बांधपाडा, सारडे, वशेणी, पुनाडे, मोठी जुई, चिरनेर, विंधणे ग्रामपंचायतीचा समावेश आहे. यामुळे समुद्राच्या उधाणाचे पाणी काही रहिवाशांच्या घरात शिरले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांनी दिली आहे.
हेही वाचा – पनवेल : खांदेश्वर वसाहतीमध्ये खड्डे पुजनानंतर तातडीने खड्डे बुजवले
आवरे, गोवठणे, बांधपाडा, पिरकोन व इतर ग्रामपंचायत हद्दीतील खाडीकिनाऱ्यावरील बांधबंदिस्ती फुटल्याने समुद्राचे पाणी भात शेतीत शिरले आहे. त्यासंदर्भात खारलँड विभागाकडून पाहणी करून तशा प्रकारचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती पेण खारलँड विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश सावंत यांनी दिली आहे.