नवी मुंबई शहराचे रस्ते चांगले व मोठे आहेत. शहरातील वाहतूकीसाठी असणाऱ्या या रस्त्यांची अवस्था संपूर्ण शहरात बिकट झाली असून रस्ते हे वाहतुकीसाठी की पार्किंगसाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शहराच्या विविध विभागातील रस्ते दुतर्फा पार्किंमुळे रस्ते झाले छोटे असे चित्र असून शहरात सर्वाधिक वर्दळ ही सीवूडस मॉलच्या परिसरात पाहायला मिळते. या मॉलच्या बाहेर नो पार्किगचे फलक असताना हव्या तश्या गाड्या पार्क केल्या जातात. परंतू बेकायदा पार्किंग केलेल्या गाड्या उचलण्यासाठी सीवूड्स वाहतूक शाखेकडे टोईंग वाहनच नाही. त्यामुळे सर्वत्र बेकायदा पार्किंग पाहायला मिळत असून वाहतूक पोलीसांना मात्र ऑनलाईन दंडात्मक कारवाईचाच आधार घ्यावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
नवी मुंबई शहरात पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक जटील व गंभीर होत असून शहरातील नो पार्किंग जागेतच पार्किंगची गर्दी पाहायला मिळत आहे. तर सम विषम पार्किंगचे फलक फक्त नावापुरते उरले आहेत. नवी मुंबई शहरात असलेले रस्ते हे नवी मुंबई महापालिका, रस्ते विकास महामंडळ,सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत करण्यात आले आहे. नवी मुंबई शहरात पालिका अंतर्गत रस्ते हे नवी मुंबई महापालिकेच्यावतीने करण्यात आले असून शहरातून जाणारे महामार्ग हे राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. दळणवळणाच्यादृष्टीने अतिशय महत्वाची भूमिका बजावणारे रस्ते हे वाहतुकीपेक्षा पार्किंगसाठीच अधिक उपयोगात येत असल्याचे चित्र नवी मुंबईतील सर्वच विभागात पाहायला मिळते. शहरात वाढती वाहनांची संख्या व पार्किंगसाठीच्या अपुऱ्या जागा यामुळे नो पार्किंगच्या ठिकाणीच वाहनांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे गाड्या झाल्या उदंड अशी स्थिती आहे. नवी मुंबईतील सर्वच रेल्वेस्थानकांच्या बाहेर पार्किंगचा खेळखंडोबा पाहायला मिळत असून शहरातील सर्वाधिक मोठा मॉल असलेल्या सीवूड्स येथील नेक्सस मॉलमुळे सीवूड्स पूर्व वव पश्चिमेला बेकायदा पार्किंग पाहायला मिळत आहे.
सीवूड्स रेल्वेस्थानकाच्या बाहेर बेकायदा वाहनांनी सर्वत्र रस्ते अडवल्याचे पाहायला मिळते. परंतू १० मिनिटासाठी बॅकेत किंवा काह कामानिमित्त दुचाकी सोडून जाताच वाहतूक पोलीस विविध विभागात दंडात्मक कारवाई करतात. परंतू या सीवूड्स परिसरात जिकडे पाहावे तिकडे रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग केले जाते.परंतू किती वाहनांना दंड करायचा वअसा प्रश्न वाहतूक पोलीसांना पडत असून दुसरीकडे बेकायदेशीरपणे गाडी पार्क केल्यावर गाडी टोईंग करण्यासाठी सीवूड्स वाहतूक शाखेकडे टोईंग वाहनच नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या ठिकाणच्या वाहतूक शाखेतील वाहतूक पोलीसांचा फक्त ऑनलाईन दडात्मक कारवाईवर भर पाहायला मिळतो.
सीवूड्स पूर्व पश्चिम परिसरात पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून वाहतूक पोलीस पहिल्या ऑनलाईन कारवाईसाठी ५०० रुपये तर दुसऱ्यांदा कारवाईसाठी १५०० ऑनलाईन दंड लावतात. परंतू संबंधित वाहनचालकांना मेसेज आल्यानंतरच याबाबत माहिती होते.नवी मुंबईमध्ये इतर विभागात ना पार्किंगमधील गाड्यावर कारवाई केल्यानंतर कोणत्या वाहतूक शाखेकडून कारवाई केली जाते ते गाडी पार्क केली जाते तिथे लिहले जाते. परंतू सीवूड्स वाहतूक शाखेकडे गाड्या उचलून नेण्यासाठी टोईंग वाहनच नसल्याने गाड्या उचलून न्यायच्या कशा असा प्रश्न पडतो.
हेही वाचा- सिडकोचे कोटींचे भूखंड बेकायदा रोपवाटिका चालकांना आंदण, पालिका व सिडकोचे दुर्लक्ष
याच सीवूड्स परिसरात मॉलमध्ये जाणाऱ्या तरुणाईची मोठी गर्दी सातत्याने पाहायला मिळते. त्यामुळे दुचाकी वाहनांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. परंतू या विभागातील वाहतूक पोलीसांची मोठी अडचण झाली असून कारवाई करायची तरी कशी असा प्रश्न पडतो.तर विभागातील नागरीक सातत्याने सोसायटीमध्येही जाण्यास रस्ता, प्रवेशद्वार शिल्लक ठेवले जात नसून हव्या तिथे गाड्या पार्क केलेल्या असल्याने स्थानिक रहिवाशी त्रासलेले आहेत. नवी मुंबईतील बेलापूर ते दिघा या सर्वच उपनगरात पार्किंगचा प्रश्न अधिक जटील बनला असून सगळीकडेच पार्किंगमुळे रस्ते झाले छोटे असे चित्र असताना सीवूड्स विभागात कारवाई करायची तर टोईंग वाहन कुठेय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नवी मुंबई शहरात बेलापूर ते दिघा या संपूर्ण शहरी तसेच मूळ गावठाणभागात बेकायदा पार्किंगचा प्रश्न अतिशय बिकट बनत चालला आहे. शहरात वारंवार वाहतूक पोलीसांमार्फत कारवाई करुनही पार्किंगचा प्रश्न संपता संपत नसल्याचे चित्र असून शहराअंतर्गत पार्किंगचा पुरता बोजवारा उडाला असून नियोजनबध्द शहर म्हणून शेखी मिरवणाऱ्या नवी मुंबईतही पार्किंगची अवस्था अत्यंत बिकट आहे. शहरातील प्रत्यक्षात रस्ते मोठे पण पार्किंगमुळे दुतर्फा जागा पार्किंग वापरासाठी येत असल्याने प्रत्यक्ष वाहतुकीसाठी रस्ते झाले छोटे असे चित्र पाहायला मिळत आहे.
हेही वाचा- रायगडात अल्पवयीन मुली पळून जाण्याचे प्रमाण वाढले
चौकट- वाहतूक विभागाने अत्यंत वर्दळ असलेल्या सीवूड्स मॉल परिसरातील कारवाईसाठी टोईंग वाहन उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. वाहतूक शाखेने याबाबत तात्काळ योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. येथील वाहतूक पोलीस फक्त ऑनलाईन दंडात्मक कारवाई करतात.परंतू बेकायदा पार्किंगसाठी योग्य त्या उपाययोजना वाहतूक शाखेने करणे गरजेचे आहे.स्थानिक रहिवाशांना या विभागातील बेकायदा पार्किंगचा मोठा त्रास होत आहे.सोसायटीत प्रवेश करायचा तरी कुठून असा प्रश्न पडतो, असे मत शिवसेनेचे पदाधिकारी समीर बागवान यांनी व्यक्त केले.
नवी मुंबई शहरात पार्किंगचा प्रश्न मोठा असून सीवूड्स विभागातील सीवूड्स वाहतूक शाखेच्या टोईंग वाहनाबाबत व जागेबाबत संपूर्ण माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल. बेकायदा पार्किंगवर वाहतूक विभाग सातत्याने कारवाई करत आहे, अशी माहिती वाहतूक विभागाचे उपायुक्त तिरुपती काकडे यांनी दिली.