पनवेल ः कामोठे उपनगरात डेंग्यू साथरोगाने १३ वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. कामोठे येथील सेक्टर २२ येथील सफायर गृहनिर्माण सोसायटीमध्ये संबंधित कुटुंब राहत होते. १३ वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान गुरुवारी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने कामोठेवासीय धास्तावले आहेत.
काही दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनाने डेंग्यू साथरोगावर मात करण्यासाठी पनवेलमध्ये लोकसभेचे आयोजन केले होते. मात्र त्यानंतरही पालिकेची उपाययोजना आणि जनजागृती तोकडी पडल्याचे चित्र आहे. महापालिकेने कामोठे उपनगरातील सेक्टर १९ ते २२ या चारही सेक्टरचा परिसर डेंग्यूचे हॉटस्पॉट (संवेदनशील ठिकाण) जाहीर केले आहेत. १२ सप्टेंबरला कामोठे येथील सेक्टर २२ मधील गुरुदेव हाईट्स या इमारतीमधील १७ वर्षीय विद्यार्थिनीचा डेंग्यूने मृत्यू झाला होता. यानंतर महापालिकेने संबंधित इमारतीची फवारणी आणि डेंग्यूसदृश रुग्णांची शोधाशोध सुरू केली होती. कामोठे उपनगरात अजूनही डेंग्यू साथरोगाचा फैलाव सुरूच आहे. गुरुदेव हाईट्सलगत असणाऱ्या सफायर इमारतीमध्ये संबंधित बालक राहत होता. या बालकावर मातोश्री रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर प्रकृती चिंताजनक झाल्यावर बालकाला बेलापूर येथील अपोलो रुग्णालयात हलविण्यात आले. डेंग्यू आजाराचे रुग्ण एका वसाहतीमध्ये का वाढलेत याबाबत नागरिक संभ्रमात आहेत.
पालिकेने यापूर्वी डेंग्यूच्या खबरदारीबाबत जागृती पत्रके जाहीर करून विविध इमारतींमध्ये वाटल्याचा दावा केला. रहिवाशांमध्ये अजूनही जागृती झाली नसल्याने डेंग्यूच्या अळ्या घरच्या फुलझाडाच्या कुंडी, एसी आणि फ्रीजच्या पाणी साचण्याच्या ठिकाणी, घराजवळील टायर, करवंट्या यासोबत उघड्या पाण्याच्या टाक्यांमध्ये उत्पत्ती होण्याची ठिकाणे असल्याने रहिवाशांना याविषयी पुढाकार घेऊन आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा लागणार आहे.
गुरुवारी कामोठ्यात १३ वर्षे वयाच्या शाळकरी मुलाचा डेंग्युमुळे मृत्यू झाला. पालिकेने फवारणी, तापाचा सर्वे, आणि लोकसभासुद्धा घेण्यात आली. असं असूनही पालिका हद्दीतील हा पाचवा मृत्यू होतो हे गंभीर आहे. नेमके कोणाचे चुकतंय यावर रहिवाशी, लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन या सर्वच घटकांनी विचार करून आत्मपरीक्षण आणि पुनर्नियोजन करणे गरजेचे आहे.
जनजागृती सर्व स्तरावर प्रभावी होणे आवश्यक आहे. पहिल्या फळीतील डॅाक्टरांचे पालिकाच्या आणि ‘आयएमए’च्या मघ्यमातून पुनर्प्रशिक्षण करण्याची गरज आहे. स्वच्छतेसाठी सर्व सोसायटी पदाधिकाऱ्यांना जबाबदार धरणे गरजेचे आहे. डेंग्यूचे विशेष कक्ष पालिका रुग्णालय आणि कामोठे येथील एमजीएम रुग्णालय येथे उभारायला हवेत. त्याची माहिती रहिवाशांना देणे गरजेचे आहे. – डॉ. सखाराम गारळे, कामोठे कॉलनी फोरम