उरण वाहतूक पोलिसांना सहकार्य करणार
उरण तालुक्यातील वाहतुक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी जेएनपीटी,सिडको तसेच रस्ते विभागाच्या संयुक्त बैठकीत वाहतुक पोलीसांना सहकार्य करण्यासाठी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय झाला असून त्यानुसार शुक्रवार पासून उरण मध्ये १२ सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेले आहेत.या रायगड सुरक्षा रक्षकांना उरण वाहतुक पोलीसांकडून वाहतुक नियंत्रणाचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहीती वाहतुक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.तसेच यामध्ये वाहतुक नियंत्रणासाठी मदतही होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वाहतुक कोंडी आणि उरण हे आता समिकरण बनल आहे. जड वाहतुक व त्यामुळे होणारे अपघात या विरोधात उरण मध्ये अनेक आंदोलने झाली आहेत.या समस्येवर उपाय योजना करण्यासाठी जेएनपीटी,सिडको तसेच रस्ते विकास मंडळाच्या बैठका सुरू आहेत.या बैठकीत जेएनपीटी व सिडको यांच्या कडून उरण व जेएनपीटी या दोन विभागातील वाहतुक नियंत्रण करण्यासाठी येथील वाहतुक पोलीसांना सहकार्य करण्यात येणार आहे.त्यासाठी दोन्हा आस्थापनांकडून किमान ५० सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे.त्याची सुरूवात करण्यात आली आहे.रायगड सुरक्षा रक्षक मंडळात नोंदणीकृत असलेल्या १२ स्थानिक तरूणांना सुरक्षा रक्षक म्हणून नेमण्यात आल्याची माहीती सर्वपक्षीय समितीचे सदस्य भूषण पाटील व प्रमोद ठाकूर यांनी दिली.यापैकी १० सुरक्षा रक्षकांचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले असून वाहतुक सुरक्षेचे नियम माहीती व्हावेत याकरीता वाहतुक पोलीसां सोबत त्यांना प्रशिक्षण देणार असल्याची माहीती उरणच्या वाहतुक विभागाचे पोलीस निरिक्षक किशोर जगताप यांनी दिली. त्यामुळे वाहतुक नियंत्रणासाठी लागणाऱ्या मनुष्यबळात वाढ झाली आहे. याचा फायदा वाहतुक नियंत्रण करण्यासाठी करू, असे ते म्हणाले.
वाहतूक नियंत्रणासाठी सुरक्षा रक्षकांची नेमणूक
रायगड सुरक्षा रक्षकांना उरण वाहतुक पोलीसांकडून वाहतुक नियंत्रणाचे प्रशिक्षण देण्यात येणार
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 20-02-2016 at 01:01 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Security guards appointed to control traffic