हयात असल्याचा पुरावा देण्याच्या अखेरच्या दिवशी बँकेबाहेर रखडपट्टी

निवृत्तिवेतन मिळवण्यासाठी हयात असल्याचा दाखला सादर करण्यासाठी १५ नोव्हेंबर ही अंतिम मुदत असल्यामुळे बुधवारी स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ इंडियाच्या शाखांबाहेर ज्येष्ठांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. अनेक निवृत्तिवेतनधारक पहाटे सहापासून रांगेत ताटकळले होते.

शासकीय किंवा निमशासकीय क्षेत्रात काम केल्यानंतर कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन मिळते. त्यासाठी निवृत्त कर्मचारी हयात असल्याचा पुरावा १ ते १५ नोव्हेंबरदरम्यान बँकेत सादर करणे आवश्यक होते. नवी मुंबईतील रबाळे येथील एमआयडीसी पट्टय़ामध्ये मोठय़ा प्रमाणात औद्योगिक वसाहत होती. तेथील अनेक कर्मचांऱ्याना सेवा निवृत्तिवेतन लागू झाले. पतीच्या निधनानंतर पत्नीला वारस म्हणून निवृत्तिवेतन मिळते. ही रक्कम फक्त बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र या शासकीय बँकांतच मिळते.

ऐरोली परिसरात फक्त रबाळे येथे स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा असल्याने या बँकेत सुमारे सात हजार निवृत्त कर्मचाऱ्यांनी निवृत्तिवेतन खाते उघडले आहे. यातील अनेक कर्मचारी बुधवारी सकाळी ६ पासूनच बँकेच्या बाहेर रांगेत बसले होते. अशीच परिस्थती अन्य शासकीय बँकांतही होती. मधुमेह, गुडघेदुखी, पाठदुखी असे त्रास असलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतनासाठी ताटकळावे लागल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ज्येष्ठ नागरिकांना तासन्तास बसवून ठेवणे चुकीचे आहे. बँकांनी वेळ वाढवून घेत काम केले पाहिजे किंवा सेवा निवृत्त झाल्याची तारखेप्रमाणे, नावांच्या आद्याक्षरांप्रमाणे किंवा जन्म तारखेप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना बोलावून ते हयात असल्याचा पुरावा घ्यावा. १ ते १५ नोव्हेंबरदरम्यान सुट्टय़ा वगळता ११ दिवसच बँक खुली होती. त्यामुळे मोजक्याच निवृत्तिवेतन धारकांचे काम करण्यात येत होते. बाकीच्यांना दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले जात होते. त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागला.

– बी. एल. वाघमारे, निवृत्त जिल्हा न्यायाधीश

सकाळी ६ पासून बँकेबाहेर उभा आहे. माझे वय ६६ आहे. रस्त्यावर ताटकळत ठेवणे अयोग्य आहे. ही स्थिती नोटाबंदीच्या काळाप्रमाणे आहे. ज्येष्ठ नागरिकांचे काम जलदगतीने व्हावे, यासाठी सरकार आणि बँकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

– बी. डी. कदम, निवृत्तिवेतनधारक