नवी मुंबई : जुहूगाव येथे विरंगुळा केंद्र उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी ज्येष्ठ नागरिक आधार संस्थेतील ज्येष्ठ नागरिक सहा वर्षांपासून पालिकेकडे पाठपुरावा करीत आहेत. या विरंगुळा केंद्राला योग्य जागा सापडत नसल्याची सबब महापालिका समाज विकास खात्यामार्फत देण्यात आली आहे. त्यामुळे जुहुगावातील ज्येष्ठ नागरिक या केंद्राच्या प्रतीक्षेत आहेत.
हेही वाचा >>> खड्ड्यात पडून मृत्यूप्रकरण; बांधकाम विकासकाविषयी प्रशासन अनभिज्ञ
ज्येष्ठ नागरिकांना सायंकाळी काही क्षण निवांत घालविण्याच्या उद्देशातून नवी मुंबई महानगर पालिकेने शहरात ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राची संकल्पना राबवली आहे. नवी मुंबई महानगरपालिका जेष्ठांना त्यांच्या हक्काचे सुसज्ज असे विरंगुळा केंद्र बांधून देणारी देशातील पहिली महानगरपालिका ठरली होती. पण अजूनही अनेक प्रभागात जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रापासून वंचित आहेत.
हेही वाचा >>> एनएमएमटीचे ‘चालते फिरते’ ग्रंथालय गायब; परिवहन विभागाच्या चांगल्या उपक्रमाला अनास्थेचे कोंदण
जुहूगावात विरंगुळा केंद्र उभारावे म्हणून येथील ज्येष्ठ नागरिक आधार संस्थेने २०१७ साली प्रथम मागणी केली होती. त्यांनतर सातत्याने महापालिकेकडे पाठपुरावा केला जात आहे. या प्रकरणाबाबत संबंधित विभागाकडून माहिती घेऊन उचित कार्यवाही करण्यात येईल असे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे म्हणाले. गेली सहा वर्षे येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राच्या प्रतीक्षेत आहेत. वाशी से.१०ए मीनाताई ठाकरे उद्यान आणि से. २९ राजीव गांधी उद्यान लांब पडते. त्यामुळे जुहूगावात ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र उभारावे यासाठी महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. – जगन्नाथ म्हात्रे, ज्येष्ठ नागरिक