ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न मार्गी लागण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. पण प्रत्यक्षात मात्र सरकारने अर्धसंकल्पीय अधिवेशनात ज्येष्ठ नगारिकांच्या कोणत्याही प्रश्नांची पूर्तता केली नाही. त्यामुळे सरकरारवर नाराजी व्यक्त करत गुरुवारी ७ एप्रिल रोजी आझाद मैदानामध्ये राज्यातील ज्येष्ठ नागरिक विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा ज्येष्ठ नागरिक संयुक्त कृती समितीने दिली आहे. तसेच या वेळी सरकाराच्या विरोधात प्रत्येक जिल्हय़ात मोर्चा काढून निषेध व्यक्त केला जाईल.
ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाडय़ात ५० टक्के सवलत मिळावी, प्रथम श्रेणीत २५ आसने असलेला स्वतंत्र डबा द्यावा. दारिद्रय़रेषेखालील मध्यमवर्गीय ज्येष्ठांच्या कुटुंबांना एक लाख ३० हजारांची अधिक विमा योजना लागू करावी. पोस्टातील अल्प बचतीवर १ एप्रिलपासून कमी केलेले व्याजदर पुन्हा वाढवून द्यावेत. काही राज्यांत ज्येष्ठांना ८०० ते १८०० रुपये अनुदान मिळते; पण महाराष्ट्रात ४०० रुपये अनुदान देण्यात येते हे अनुदान १ हजार रुपये करावे. दारिद्रय़ रेषेसाठी वार्षिक २१ हजार रुपये उत्पन्नाची अट शिथिल करावी. वयोमर्यादा ६५ वरून ६० करावी. रक्तदाब, मधुमेहावर मोफत औषधोपचार आदी मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांची संख्या सव्वा कोटीपर्यंत असून त्यांच्या समस्यांत वाढ झाली आहे. आघाडी सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केले. पण अर्थसंकल्पात मात्र तरतूद केली नाही. विधानसभा निवडणुकीमध्ये युती सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले, पण प्रत्यक्षात मात्र ज्येष्ठ नागिरकांसाठी कोणतीच तरतूद केली नाही. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येठ नागरिकांना भेट देण्याचे नाकारले आहे, असा आरोप ज्येष्ठ नागरिक संयुक्त कृती समितीने केला आहे. त्यामुळे शासनाच्या विरोधात गुरुवारपासून आंदोलन करणार असल्याचा निर्णय ज्येष्ठ नागरिक संयुक्त कृती समितीने घेतला असून या संदर्भात एकाच दिवशी राज्यात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. तर मुंबई़, नवी मुंबईमधील ज्येष्ठ नागरिक आझाद मैदानामध्ये आंदोलन करणार असल्याचे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ. एस.पी. किंजवडकेर यांनी सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा