नवी मुंबई – राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करोना लसीकरण कार्यक्रमांतर्गत नाकावाटे घ्यावयाचा इन्कोव्हॅक लसीचा समावेश करण्यात आला आहे. नाकावाटे दिली जाणारी ही पहिलीच करोना प्रतिबंधक लस आहे. शनिवारपासून या लसीकरणास पालिकेने सुरुवात केली आहे, परंतु मागील दोन दिवसांत एकाही लाभार्थ्यांने या लसीकरणाचा लाभ घेतला नाही.

नाकावाटे देण्यात येणाऱ्या या लसीमुळे पेशींची रोगप्रतिकार क्षमता वाढणार असून थेट स्नायूमध्ये इंजेक्शन न देताच ही लस सुरक्षा प्रदान करणार आहे. सध्या राज्यात करोना रुग्णांची वाढती संख्या आणि ६० वर्षांवरील नागरिकांना सहव्याधी असल्याने ते अतीजोखमीचे असल्यामुळे प्रथमतः या वयोगटातील नागरिकांना वर्धक मात्रा सुरू करण्यात आली आहे. कोव्हीशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन लसीची दुसरी मात्रा घेतल्यानंतर ६ महिने पूर्ण झालेले लाभार्थी या वर्धक मात्रेसाठी पात्र आहेत. या लसीचे डोस महानगरपालिकेच्या वाशी, नेरुळ व ऐरोली येथील सार्वजनिक रुग्णालयांमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत देण्यात येत आहेत.

हेही वाचा – लॅपटॉप आणि मोबाईल चोरी करण्यासाठी कर्नाटकमधून नवी मुंबईत, मुका आरोपी झाला बोलका

वर्धक मात्रा घेण्याकरिता दुसरा डोस घेतल्याचा पुरावा तसेच ६० वर्षांवरील नागरिक असल्याबाबतचा योग्य पुरावा असणे आवश्यक आहे. पुराव्यांमध्ये कार्यालयीन ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकॉर्ड, निवडणूक ओळखपत्र इत्यादी ओळखपत्रे आवश्यक आहे. तरी ६० वर्षांवरील दुसरा डोस घेऊन ६ महिने पूर्ण झालेल्या नागरिकांनी वर्धक मात्रा घेऊन करोना संरक्षित व्हावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.

नवी मुंबई शहरात पुन्हा एकदा करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. एका दिवसाला ५० नागरिकांना करोनाची बाधा झाल्याचे चाचणीत आढळून येत आहे. त्यामुळे शहरातील करोनाचा धोका हळूहळू वाढत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे केंद्रशासन व राज्य शासनामार्फत पुरवण्यात येणाऱ्या लसमात्रा एक एप्रिलपासून थांबवण्यात आल्या होत्या, त्यामुळे शहरात एक एप्रिलपासून लसीकरण पूर्णतः बंद होते. शहरातील नागरिकांकडून पुन्हा लसीकरण सुरू करण्याची मागणी ही महापालिकेकडे करण्यात येत होती. त्यातच शनिवारपासून केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार नवी मुंबई महापालिकेला नाकाद्वारे लस देण्याच्या ६०० मात्रा प्राप्त झालेल्या आहेत. पालिकेने वाशी, नेरूळ, ऐरोली या तीन रुग्णालयांत कालपासून लसीकरणाची सुरुवात केलेली आहे, परंतु नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने दोन दिवसांत एकही वर्धक मात्रा देण्यात आली नसल्याची माहिती पालिकेकडून मिळालेली आहे.

हेही वाचा – एक महिना शीव-पनवेल मार्गावरील नेरुळ उड्डाणपुलाची दुरूस्ती, मुंबईतून बाहेर पडण्यास कित्येक तास लागण्याची भीती

ज्या पोर्टलद्वारे नागरिकांची नोंदणी होणार आहे त्यातही तांत्रिक अडचणी येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महापालिकेने एकीकडे लसीकरण सुरू झाल्याची जाहीर केले असले तरी पात्र नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

नवी मुंबई महापालिकेला नाकावटे दिल्या जाणाऱ्या ६०० वर्धक मात्रा प्राप्त झाल्या असून पालिकेने वाशी, नेरूळ, ऐरोली या तीन रुग्णालयांत लसीकरण देण्याची पूर्ण व्यवस्था केली असून, केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या नियमानुसार साठ वर्षांवरील व दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांनी या वर्धक मात्रांचा लाभ घेऊन स्वतःला संरक्षित करावे, असे आवाहन नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केले.

Story img Loader