पनवेल: दोन दिवसांपूर्वी झालेल्या दिवाळीच्या लक्ष्मीपूजनासाठी देवा-यासमोर ठेवलेले सोन्याचे सर्व दागिने चोरट्यांनी घरात शिरुन चोरुन नेल्याची घटना पनवेलमध्ये घडली. पनवेल शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर विघ्नहर्ता सोसायटीमध्ये ही घटना मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. जयेंद्र पाटील व कुटुंबियांनी सोमवारच्या लक्ष्मीपूजनासाठी त्यांच्या घरातील देवाऱ्याजवळ सोन्याचे मंगळसूत्र, कानातले, दोन अंगठी, दोन हार, तीन चेन, चेनचे पेन्डंड, नथ, गळ्यातील सर असा सर्व सोन्याचा एेवज आणि १० हजारांची रोख रक्कम चोरटयांनी चोरला.
जयेंद्र यांचे घराचे दार उघडले असल्याने चोरटे घरात शिरल्याचे पोलीसांच्या तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे नवेल पालिकेला पोलीस प्रशासनाने शहरात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र अजूनही त्यावर अंमलबजावणी पालिकेने केलेली नाही. सराफा व्यापा-यांनी त्यांच्या दागिन्यांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे दुकानासमोरील रस्त्यांवर आणि चौकात लावले. मात्र पनवेल शहराच्या लोकवस्तीच्या भागातील सुरक्षा रामभरोसे उरली असल्याची भावना जयेंद्र पाटील यांच्या घरातील चोरीनंतर लक्षात येत आहे. या घटनेनंतर पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी दोन वेगवेगळी पथके स्थापन करुन चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात चोरट्याविरोधात सात लाख रुपयांचे सोने चोरी केल्याबद्दल गुन्हा नोंदविण्यात आला आहे.