शिक्षण क्षेत्रात महत्त्वाच्या ठरलेल्या व ग्रामीण गोरगरिबांना शिक्षणाची कवाडे उघडी करणारी माझी गावची शाळा आता कोंडवाडा बनली असून ती भरेल का असा प्रश्न पडलेला असताना उरणच्या शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या सारडे शाळेच्या पाठोपाठ उरण तालुक्यातील ग्रामीण भागातील करंजा येथील कोंढरी, बोरखार, दिघोडे, पुनाडे, नागाव, मुळेखंड व पागोटे या सात शाळांचे डिजिटेलायझेशन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तयारी सुरू केली असून येत्या दोन महिन्यांत त्याची अंमलबाजवणी होणार असल्याची माहिती उरणच्या शिक्षण विभागाने दिली आहे. शहरीकरण व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे गावातील पूर्वजांनी आपल्या मालकीच्या जागा देत अंगमेहनत करून गावातील प्राथमिक शाळांची उभारणी केलेली होती. मागील वीस वर्षांत या शा़ळांना टाळे लागले आहे. वर्गातील घटती विद्यार्थीसंख्या व असुविधा यामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा ओस पडू लागल्या आहेत. अनेक शाळांमधून गावातील स्थानिक विद्यार्थ्यांऐवजी परप्रांतीय व भाषीय विद्यार्थ्यांचीच संख्या वाढू लागली आहे. शासनाने सर्व शिक्षा अभियान राबवून विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी अनेक योजनाही राबविल्या तरीही याचा परिणाम झाला नाही. शाळांमध्ये अनेक सुविधाही उपलब्ध असल्या तरी विद्यार्थी मात्र येत नसल्याने राज्य सरकारने अशा शाळा बंदच करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा वेळी उरण तालुक्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा टिकविण्यासाठी उरण पंचायत समितीच्या शिक्षण विभाग आणि विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. याची सुरुवात त्यांनी उरण तालुक्यातील सारडे गावातील शाळेपासून केली असून या डिजिटल शाळेत विनादप्तर आनंददायी शिक्षण दिले जात असल्याने विद्यार्थीसंख्याही वाढू लागली आहे. याच धर्तीवर उरणमध्ये किमान ७० ते ९० हजार रुपये खर्चाच्या डिजिटल व शाळा उभारण्यात येत असल्याची माहिती उरणच्या गटविकास अधिकारी प्रियांका पाटील यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा