नवी मुंबई शहर हे स्मार्ट सिटी नसून रोगी सिटी झाले आहे. आरोग्य विभागाला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे, अशा शब्दांत सर्वपक्षीय नगरसेवकांनी विशेष महासभेत पालिकेच्या आरोग्य खात्याचे वाभाडे काढले. आरोग्य खात्याचे आधिकारी खासगी रुग्णालयांना अप्रत्यक्ष मदत करीत असल्याचा गंभीर आरोप करत कंत्राटदारांनादेखील हे आधिकारी पाठीशी घालत असल्याने शहराच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उद्भवल्याची टीका नगरसेवकांनी केली. डेंगीमुळे आतापर्यंत २२ जणांचा बळी गेला असून दोषी आधिकांऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करत सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालिकेच्या आरोग्य खात्याला चांगलेच धारेवर धरले. सहआयुक्तपदी असलेल्या आरोग्य खात्याचे तत्कालीन प्रमुख डॉ. संजय पत्तीवार व डॉ. दीपक परोपकारी यांना टीकेचे लक्ष्य करण्यात आले.
आरोग्य विभागाने साथीच्या आजारांच्या नियंत्रणाबात केलेला दावा खोटा असून २२ रुग्णांचा मृत्यू डेंगीमुळे झाला असताना पालिकेच्या नोंदीनुसार केवळ दोघांचा मृत्यू झाल्याचे दिसत आहे, अशी टीका नगरसेवक रवींद्र इथापे यांनी केली. पालिकेच्या जागेवर भाडय़ाने सुरू असलेल्या फोर्टिस रुग्णालयाबाबत अनेक तक्रारी असून रुग्णालयाचा करारनामा रद्द करण्याची मागणीदेखील इथापे यांनी केली. पालिकेच्या आकडेवारीनुसार रुग्णांची संख्या कमी आहे, मात्र रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी कशी वाढत आहे, असा सवाल नगरसेवक गिरीश म्हात्रे यांनी केला. पालिका प्रशासन हे कंत्राटदार आणि खासगी डॉक्टर यांच्यासाठी राबत असल्याचा गंभीर आरोप नगरसेवक नवीन गवते यांच्यासह सर्वच नगरसेवकांनी केला. आरोग्य आधिकाऱ्यांच्या कार्यशैलीमुळे खासगी रुग्णालयांचा फायदा होत आहे, हेदेखील त्यांनी निदर्शनास आणले. मलेरिया व डेंगीचे केवळ दोन रुग्ण दाखविणे हा गंभीर प्रकार असून असा खोटा अहवाल बनविणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी केली. साफसफाई, ठेका रखडलेली रुग्णालये व इतर अनागोंदंी कारभारावर जोरदार टीका करत आरोग्य विभागाचे वाटोळे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काढून टाका, अशी मागणी नगरसेवकांनी केली. पालिकेच्या रुग्णालयात मुंबईचे रुग्ण सरसकट भरती केले जातात त्यामुळे नवी मुंबईतील नागरिकांना त्याचा लाभ घेता येत नाही. सर्व खाजगी रुग्णालयांमध्ये पालिकेच्या वतीने १५ टक्के राखीव जागा ठेवल्या पाहिजेत, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी केली. पर्यावरणाच्या अहवालाप्रमाणे आरोग्य विभगाचा अहवाल दर सहा महिन्यांनी सादर करावा असे सभागृह नेते जे. डी. सुतार यांनी सुचवले. पालिकेच्या रुग्णालयात रुग्णांना चांगल्या पद्धतीची वागणूक मिळत नसल्याचा आरोप करत, नवी मुंबईतील नेरुळ, ऐरोली, बेलापूर येथे बांधण्यात आलेली पालिकेची रुग्णालये लवकर सुरू करावीत, अशी मागणी उपमहापौर अविनाश लाड यांनी केली. तर डेंगी, मलेरियाविरोधात लढा देण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य सभापती पूनम पाटील यांनी केले. या विषयावर तब्बल १० तास चर्चा चालली, ३७ नगरसेवकांनी या चर्चेत भाग घेतला. महापौर सुधाकर सोनावणे यांनी मुख्य वैद्यकीय आधिकारी दीपक परोपकारी यांना नरसेवकांच्या आक्षेपांवर लेखी उत्तरे देण्याची सूचना केली.
इन मिन २८!
आरोग्य विभागाच्या कारभारावर लांबलेल्या या चर्चेच्या अखेरीस महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते, आरोग्य सभापती यांचे विचार ऐकण्यासाठी १११ नगरसेवकांपैकी केवळ २८ नगरसेवक सभागृहात उपस्थित होते.