पनवेलमध्ये नव्याने पक्षबांधणी करणा-या शिवसेनेच्या शिंदे गटाने पनवेलच्या शहरीवस्तीमध्ये स्वताच्या पक्षाची मोट बांधण्याचे धोरण आखून महाविकास आघाडीतील शेकाप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिका-यांना गळीस लावले आहे. खांदेश्वर वसाहतीमधील शेकापचे माजी नगरसेवक शिवाजी थोरवे, कामोठे येथील अर्जुन डांगे आणि रोडपाली येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी चंद्रकांत राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या मुंबई येथील वर्षा निवासस्थानी पक्षप्रवेश करुन शिंदे गटात सामिल झाले.
पनवेलमध्ये महाविकास आघाडीची राजकीय शक्ती भारतीय जनता पक्षासमोर अगोदर कमी पडत असताना शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये पदाधिकारी व कार्यकर्ते सामिल होत असल्याने महाविकास आघाडी पनवेलमध्ये अजूनच कमकुवत होणार आहे. कामोठे वसाहतीमधील शेकापचे डांगे यांच्यावर शहर उपाध्यक्षाची जबाबदारी होती. तर पनवेल नगरपरिषदेचे माजी नगरसेवक थोरात यांनी शासनाकडील सातत्याच्या पाठपुराव्यामुळे खांदेश्वर वसाहतीसमोरील उड्डाणपुल आणि खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या इमारतीचा प्रश्न सोडविला होता. दुधविक्रीतून रहिवाशांचे प्रश्न सातत्याने मांडणारे अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ओळख होती.
गेल्या अनेक वर्षांपासून पक्षामध्ये त्यांचे कोणतेही मत विचारात घेतले जात नसल्याने त्यांनी शिंदे गटाचे नेतृत्व स्विकारले. रोडपाली व कळंबोली परिसरात राऊत यांचा जनसंपर्कामुळे राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची सत्ता असताना राऊत यांची वर्णी या पदावर लागली होती. चंद्रकांत राऊत यांच्याकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शहर सचिव पदाची जबाबदारी होती. शिंदे गटाचे रामदास शेवाळे, अँड.प्रथमेश सोमण यांच्याकडूनच विविध राजकीय पक्षांतून पनवेल पालिकेची प्रभाग रचना जाहीर झाल्याने निवडणूक कार्यक्रम कधीही लागू शकतो अशी स्थिती असल्याने शिंदे गटाने शहरी वस्तींमध्ये पक्षाची मोर्चेबांधणी जोरदार सूरु केली आहे.