तुर्भे झोपडपट्टी क्षेत्रातील सहा सात प्रभागात गेली अनेक वर्षे प्रभाव असलेले प्रभावी माजी नगरसेवक आणि बाळासाहेबांची शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुरेश कुलकर्णी यांनी शिंदे गटाला सोडचिठ्ठी देणार असल्याचे संकेत रविवारी झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात दिले. मात्र, मंगळवारी त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चेला बोलविले आहे.
हेही वाचा – नवी मुंबई : कर्कश स्फोट, धुळीचे प्रदूषण विरोधात मानवी साखळी, ३५० लोकांचा सहभाग
जून २०२२ मध्ये शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर राज्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आपल्याकडे वळविण्याचा शिंदे गट सातत्याने प्रयत्न करीत आहे. नवी मुंबईतील आजी माजी नगरसेवक यांच्यासह अर्ध्यापेक्षा जास्त पदाधिकारी शिंदे गटाच्या आश्रयाला गेले आहेत. यात तुर्भे स्टोअर येथील सात प्रभागांत दांडगा जनसंपर्क असलेले सुरेश कुलकर्णी यांचा देखील समावेश आहे. कुलकर्णी दरवर्षी जानेवारी महिन्यात या क्षेत्रातील महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करतात. यंदाही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृह राज्यमंत्री व पालकमंत्री शंभूराजे देसाई यांना दोन महिन्यांपूर्वी वेळ घेऊन निमंत्रित करण्यात आले होते, पण हे दोन्ही मंत्री न आल्याने कुलकर्णी यांना संताप अनावर झाला. कार्यक्रमाला बोलवून येत नाहीत, लोकांची कामे केली जात नसतील तर अशा पक्षात राहून काय उपयोग, त्यापेक्षा हा पक्ष सोडलेला बरा, अशा शब्दात कुलकर्णी यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. यावेळी दहा ते पंधरा रहिवाशी, जिल्हाप्रमुख विजय चौगुले आणि उपजिल्हाप्रमुख किशोर पाटकर उपस्थित होते.