लोकसत्ता प्रतिनिधी
नवी मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने नवी मुंबईत नव्याने संघटना बांधणीला सुरुवात केली असून अनिकेत म्हात्रे यांची पक्षाच्या युवा अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचे नेते रमाकांत म्हात्रे यांच्यासह अनिकेत यांनी विधानसभा निवडणुकीनंतर शिंदे सेनेत प्रवेश केला होता. ऐरोली विधानसभा मतदारसंघातून ते काँग्रेसच्या तिकिटावर इच्छुक होते. त्यांच्याकडे युवा अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवून नव्याने पक्षात आलेल्यानाही मानाचे स्थान देता येते, असा संदेश देण्याचा प्रयत्न शिंदे सेनेने केला आहे.
नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपाचे आमदार असून वनमंत्री गणेश नाईक यांचा येथील महापालिकेवर आणि सत्ता केंद्रांवर दबदबा राहिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक या दोन बड्या नेत्यांमध्ये सध्या वर्चस्वाची लढाई सुरू आहे. शिंदे यांच्या ठाण्यात जनता दरबार घेत, नाईक यांनी त्यांना खुले आव्हान दिले आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षातील माजी नगरसेवकांना गळाला लावण्याची मोहीम शिंदे सेनेने गेल्या काही दिवसांपासून राबवण्यास सुरुवात केली आहे.
येत्या महिनाभरात नवी मुंबईतील जवळपास दहा पेक्षा अधिक माजी नगरसेवक शिंदे सेनेत प्रवेश करतील अशी चिन्ह आहेत. एकीकडे माजी नगरसेवकांना प्रवेश देत असताना शिंदे सेनेने संघटनात्मक बांधणीकडेही लक्ष केंद्रित केले आहे. नवी मुंबईतील काँग्रेसचे नेते रमाकांत म्हात्रे यांनी विधानसभा निवडणुकीनंतर शिंदे सेनेत प्रवेश केला होता. ऐरोली परिसरात मोठी जाहीर सभा घेत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शनही केले होते. म्हात्रे यांच्या प्रवेशानंतर दोन महिने उलटले तरीही त्यांना कोणते पद दिले गेले नव्हते. अखेर म्हात्रे यांचे पुत्र अनिकेत म्हात्रे यांच्याकडे युवा सेनेच्या नवी मुंबई जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी सोपवून शिंदे सेनेने नव्याने पक्षात एक उच्चणाऱ्यांना सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
नव्याने पक्षात येणाऱ्यांनाही आपण मोठी जबाबदारी देतो असा संदेश देत, नवी मुंबई आणखी काही माजी नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांना पक्षाची दारे खुली असल्याचा संदेश या निमित्ताने शिंदे सेनेने दिला आहे. विधानसभा निवडणुकीत ऐरोली विधानसभा मतदारसंघातून अनिकेत म्हात्रे हे इच्छुक होते. मात्र पक्षाने हा मतदार संघ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी सोडला. या ठिकाणी उबाठा पक्षाचे एम के मढवी यांचा दारुण पराभव झाला. अनिकेत म्हात्रे यांना पक्षात प्रवेश देऊन आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेने संघटनात्मक बांधणीसाठी आणखी एक पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.