नवी मुंबई : नवी मुंबईतील शिवसेनेचे (शिंदे) नेते विजय नहाटा यांच्या बंडामुळे सतर्क झालेल्या शिंदे गटातील नेत्यांनी बुधवारी रात्री उशिरा शहरातील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर उभे केले. कोणत्याही परिस्थितीत पक्षात फूट पडता कामा नये, अशा शब्दांत यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित मंडळींना सुनावले. ‘आमचा तुम्हाला विरोध नाही…परंतु भाजप नेते गणेश नाईक यांच्यासाठी आम्ही काम करणार नाही’,अशी उघड भूमिका यावेळी या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांवर विश्वास असल्याचा सूर आळवत नवी मुंबईतील शिंदे समर्थकांनी नाहटा यांना पाठिंबा असल्याचे संकेत दिले.

नवी मुंबईतील विधानसभेच्या दोन्ही जागा भाजपला सुटतील हे जवळपास पक्के मानले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नवी मुंबईतील समर्थकांचा भाजप नेते गणेश नाईक यांना कडवा विरोध आहे. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारातही शिंदे गट आणि गणेश नाईक यांच्यामधील हा दुरावा दिसून आला. म्हस्के यांच्या प्रचारात सहभागी होणारे नाईक शिवसेनेच्या कार्यालयात मात्र जात नसत्र. तसेच मुख्यमंत्री समर्थक नेत्यांबरोबर एकत्र जाणेही त्यांनी टाळले होते. त्यामुळे या दोन पक्षांतील नवी मुंबईतील दरी वेळोवेळी स्पष्ट होत होती. निवडणुका तोंडावर येताच समर्थक आक्रमक झाले असून गणेश नाईक यांना त्यांच्याकडून जाहीर विरोध सुरू झाला आहे. नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही विधानसभा जागांवर भाजपचे विद्यामान आमदार आहेत. या दोन्ही मतदारसंघांवर नाईक कुटुंबीयांनी दावा सांगितला असून यामुळे शिंदे गटातील नेत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.

हे ही वाचा…अत्याधुनिक साधनांमुळे सायबर गुन्हेगार आपल्यापेक्षा पुढे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शिंदे गटाचे नेते विजय नाहटा यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. तसेच शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करत असल्याचेही जाहीर केले. गणेश नाईक यांच्या कुटुंबीयांना विधानसभेच्या दोन जागा देणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका नहाटा यांनी मांडली होती. नहाटा यांच्या भूमिकेमुळे शिंदे गटातील नेतेही आता सतर्क झाले असून खा. नरेश म्हस्के यांनी नवी मुंबईतील पक्षाची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून झाडाझडती?

दरम्यान खा. नरेश म्हस्के यांनी बुधवारी रात्री नवी मुंबईतील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर बोलावली होती. रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी या नेत्यांची भेट घेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही परिस्थितीत पक्षात फूट पडता कामा नये, असेही या नेत्यांना सुनावले. महायुतीचा धर्म पाळायला हवा आणि मी तुमच्या पाठीमागे सदैव उभा आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी या पदाधिकाऱ्यांना धीर दिला. त्यानंतरही काही पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी ‘आमचा तुम्हाला विरोध नाही तर नाईकांचा प्रचार करणे आम्हाला शक्य नाही’,अशी भूमिका मांडली.

हे ही वाचा…Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावर उतरलं पहिलं विमान! धावपट्टीची चाचणी यशस्वी; नियमित वाहतूक कधी सुरू होणार?

शिंदे समर्थकांचे म्हणणे…

नवी मुंबईतील दोन्ही जागा नाईक यांना सोडल्यास भविष्यकाळात ते आम्हाला त्रास देतील. आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करतील. गणेश नाईक जेव्हा महापालिकेत जातात, तेव्हा तुमच्या (मुख्यमंत्री) विरुद्ध भूमिका घेतात. तुम्ही शहरात एखाद्या कार्यक्रमाला येत असाल तर त्याला विरोध करतात. लोकसभा निवडणुकीतही त्यांनी नरेश म्हस्के यांच्याविरोधात प्रचार केला. हे सगळे सहन करण्यापलीकडे आहे. त्यामुळे आम्ही नाईकांना साथ देणे शक्य नाही, अशी भूमिका पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्याचे समजते. ‘तुम्ही म्हणत असाल तर आम्ही पक्ष सोडणार नाही. नाहटा यांच्यावर आमचे प्रेम नाही. नाईकांना आमचा विरोध आहे’, असेही यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे कळते. आपण सगळे एकत्र बसून हा प्रश्न सोडवू अशा, शब्दांत मुख्यमंत्र्यांनी या पदाधिकाऱ्यांची समजूत घातल्याचे समजते.