राज्यात सर्वप्रथम स्मार्ट सिटी योजनेला विरोध करणाऱ्या नवी मुंबईतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावाने शिमगा करणारी शिवसेना आणि त्या पक्षाचे अतिउत्साही नगरसेवक विधानसभेतील शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या स्मार्ट सिटीविरोधामुळे चांगलेच तोंडघशी पडले आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या समर्थनार्थ जाहीर केलेला १८ डिसेंबरचा ‘नवी मुंबई बंद’ गुंडाळण्याची नामुष्की सेनेवर ओढावली आहे. स्मार्ट सिटी प्रस्तावाला विरोध करणाऱ्या राष्ट्रवादीने टक्केवारीसाठी प्रकल्पाला विरोध केल्याची टीकाही या पक्षातील धुरंधर नगरसेवकांनी केली होती.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत राज्यातील दहा शहरांचा समावेश करण्यात आला असून त्यात नवी मुंबई आघाडीवर आहे. त्यामुळे प्रशासनाने विविध उपाययोजना करून चार महिने हा प्रस्ताव तयार केला. स्मार्ट सिटीतून विशेष कंपनीला वगळत नाही तोपर्यंत स्मार्ट सिटी प्रस्तावाला मान्यता दिली जाणार नाही, अशी भूमिका सत्ताधारी राष्ट्रवादीने घेतली होती. त्यामुळे पालिकेतील शिवसेना व भाजप या दोन विरोधी पक्षांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हा प्रस्ताव ऑनलाइन सादर करण्याचे आदेश पालिकेला दिले. मात्र नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनात सोमवारी शिवसेनेच्याच आमदाराने या योजनेला विरोध केल्याने नवी मुंबईतील शिवसेना तोंडघशी पडल्याचे चित्र उभे राहिले. स्मार्ट सिटीला विरोध करण्यासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांनी वाशी येथील शिवाजी चौकात जोरदार टीका करताना राष्ट्रवादीवर मनसोक्त तोंडसुख घेतले. यात शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल मोरे, नामदेव भगत हे आघाडीवर होते. स्मार्ट सिटीसाठी सूचना पाठविणाऱ्या चार लाख लोकांच्या भावनांचा विचार करण्यात आला नसल्याचे जाहीर करीत येथील शिवसेनेने विरोध दर्शविला होता.
स्मार्ट सिटीचा प्रस्ताव फेटाळणाऱ्या एका पालिकेच्या जागी पिंपरी चिंचवड पालिकेची निवड करण्यात यावी, असा प्रस्ताव राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत मांडला आहे. या वेळी त्यांनी नवी मुंबईचे नाव घेण्याचे टाळले.

Story img Loader