शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचे पक्षाकडून स्वागत; मार्गावर वाहनचालकांच्या गोंधळात भर
लोकांच्या समस्या, मत पोटतिडिकीने संसदेत मांडल्याबद्दल ‘संसदरत्न’ पुरस्काराने गौरविले गेलेले शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांची मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरील फलकबाजी सध्या वाहनचालकांना गोंधळात टाकत आहे. कळंबोली येथील मॅकडोनाल्ड हॉटेलसमोर बारणे यांचे छायाचित्र असलेला भलामोठा फलक दिशादर्शक फलकावर लावण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी खासदार बारणे यांच्या खारघर येथील घरी पक्षाच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याची ही फलकबाजी आहे. बारणे यांच्यासोबत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदेश बांदेकर, आदित्य ठाकरे यांचीही छायाचित्रे फलक लावणाऱ्यांनी झळकवले आहेत. शिवसेनेचे पनवेल विभाग प्रमुख वासुदेव घरत यांचे छायाचित्र या फलकावर असल्याने त्यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी हा फलक शिवसेनेने लावल्याचे सांगून आपण कार्यक्रमात व्यस्त असल्याचे सांगितले.
फलक मुंबई महानगर रस्ते विकास महामंडळाच्या परवानगीने लावलाय का, असे विचारल्यावर आपण सध्या सायंकाळी होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीत व्यस्त असल्याने माहिती घेऊन कळवतो, असे त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. या फलकबाजीमुळे दिशादर्शक फलक झाकल्याने सामान्यांना त्रास होत असल्याचे खासदार बारणे यांना सांगितल्यावर त्यांनी हा फलक कोणी लावलाय, याची माहिती घेतो, असे सांगून लवकरच काढण्याचे आदेश देतो, अशी प्रतिक्रिया दिली.
पनवेल शहरात सिडकोच्या वसाहती अशा फलकांमुळे आधीच विद्रूप झाल्या आहेत. त्याचा सामान्यांना होणारा त्रास सर्वश्रुतच आहे. यात कायद्याचा धाक म्हणून फलक काढण्याऐवजी मोकळ्या जागेत ते मोठय़ा संख्येने लावता कसे येतील, यावरून राजकीय पुढाऱ्यांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. यावरून अनेकदा वादही झडल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
वाढदिवस ते पनवेल महानगरपालिका..
कळंबोली, खारघर, कामोठे, खांदेश्वर आणि नवीन पनवेल वसाहतीत फलकबाजीचे प्रमाण अधिक आहे. यात लहान मुलांचे वाढदिवस, नेत्यांचे वाढदिवस वा नवे पद मिळाल्याबद्दल अभीष्टचिंतन याशिवाय शिकवणी वर्ग, नेत्यांची जयंती अशा अनेक कारणांवरून फलकबाजी होत असते. माथाडी कामगारांचे नेते गुलाबराव जगताप यांचा जानेवारीमध्ये वाढदिवस होता, त्या वेळी कळंबोलीत अशाच प्रकारे फलकबाजी करण्यात आली. पनवेल महानगरपालिका अस्तित्वात येणार असल्याच्या वृत्तानंतर पुढाऱ्यांनी चौकाचौकांत फलकबाजी सुरू केली आहे.