सिडको प्रशासनाने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन केलेल्या दक्षिण नवी मुंबईच्या महत्वकांक्षी प्रकल्पाला शिवसेनेने विरोध केला आहे. अगोदर पनवेलच्या शेतकऱ्यांचे व प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवा त्यानंतर खुशाल प्रकल्प उभारा असा पत्रहल्ला शिवसेनेने सिडकोवर चढविला आहे. रायगड जिल्ह्य़ाचे शिवसेनेचे सल्लागार बबन पाटील यांनी हे पत्र सिडकोला पाठविले आहे.
नैना व स्मार्ट सीटी बनविण्यासाठी सिडकोने जोरदार तयारी सुरु केल्यानंतर शिवसेना सत्तेत असतानाही सिडको मंडळाला आंदोलनाचा इशारा दिल्याने सरकारला घरचा आहेर मिळाला आहे. ज्या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री स्वत: करतात त्या प्रकल्पाला शिवसेनेने केलेल्या विरोधामुळे शेतकरी कामगार पक्षाने शिवसेनेच्या सूरात सूर मिळवत अगोदर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा नंतर स्मार्ट सीटी उभारा अशी चिथावणी दिली आहे. पनवेलच्या भूमिपुत्रांच्या जमिनीवर सिडकोने स्मार्ट सीटी उभारण्याचा निर्णय घेतला, प्रकल्पग्रस्तांना दोन दशकानंतर संपूर्ण मोबदला सिडकोने दिलेला नाही. प्रकल्पग्रस्त अजूनही न्याय मिळण्यासाठी सिडकोभवनासमोर उपोषणाला बसत आहेत याची दखल सिडको प्रशासनाने न घेता थेट स्मार्ट सिटी म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.
नैना बाधित शेतकऱ्यांचे म्हणने सिडको प्रशासनाने ऐकावे,त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात त्यानंतर नैना प्रकल्प राबवावा असेही पाटील यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.