उरण : जासई उड्डाणपुलाच्या मार्गिकेत येणाऱ्या शिवमंदिराच्या उभारणीसाठी सव्वा कोटीच्या निधीअभावी गेली अनेक वर्षे एका मार्गिकेचे काम रखडले आहे. त्यामुळे उरण, नवी मुंबई, जेएनपीए बंदराशी जोडणाऱ्या जासई उड्डाणपुलावरील पनवेल आणि नवी मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवरील अडथळा ठरू पाहात आहे. वर्षभरात चर्चेच्या फेऱ्या होऊनही याबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही. उड्डाणपुलाच्या रखडलेल्या मार्गिकेमुळे हा उड्डाणपूल अपघाती क्षेत्र म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.
जेएनपीए-नवी मुंबई दरम्यान प्रचंड प्रमाणात होणाऱ्या वाहतुकीमुळे दास्तान फाटा जासई ते गव्हाण फाटादरम्यान दररोज वाहतूककोंडी होत होती. या वाहतुकीचा वाढता ताण कमी करण्यासाठी दास्तान फाटा-जासई ते शिवमंदिर यादरम्यान १२०० मीटर लांबीचा आणि सुमारे १०० कोटींहून अधिक खर्चाचा चौपदरी जासई उड्डाणपूल उभारण्यात आला. या उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेवरून वर्षापूर्वी वाहतूकही सुरू करण्यात आली आहे. मात्र या उड्डाणपुलाच्या एका मार्गिकेवर असलेल्या शिवमंदिरामुळे १०० मीटर लांबीचे काम रखडले आहे.
शिवमंदिरासाठी सिडको, जेएनपीए, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या मध्यस्थीने २५ गुंठे जागा चिर्ले गाव हद्दीत देण्यात आली आहे. तसेच जेएनपीएकडून सव्वा कोटी रुपये व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सव्वा कोटी रुपये असा निधीही शिवमंदिर चिर्ले गावाच्या हद्दीत उभारण्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. मात्र शिवमंदिर व मंदिरासभोवताली संरक्षण भिंत उभारण्यासाठी सुमारे पावणेचार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे मंजूर झालेली अडीच कोटींची रक्कम मंदिराच्या कामासाठी अपुरी आहे. त्यामुळे शिवमंदिर हटविण्यात आले नसल्याची माहिती जासई सरपंच संतोष घरत यांनी दिली.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या समस्यात वाढ होत चालली आहे. तीन-चार महिन्यांनंतर ठेकेदाराच्या कामाचीही मुदत संपुष्टात येणार आहे. त्यामुळे १०० मीटरच्या रखडलेल्या कामासाठी पुन्हा निविदा मागविण्याची पाळी येऊन ठेपली आहे. थोडक्या कामासाठी ठेकेदार पुढे येण्याची शक्यताही कमी दिसते. त्यामुळे वाढलेल्या अतिरिक्त सव्वा कोटी खर्चाच्या तरतुदीचा प्रश्न सोडविण्यासाठी जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांच्याशी चर्चा सुरू आहे. यशवंत घोटकर, उपाध्यक्ष, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण