नवी मुंबईत मनपाचा आरोग्य विभाग कोरोना विषाणू प्रतिबंध उपायांच्या बाबतीत अगोदरच टीकेचा धनी होत असताना, याच आरोग्य  विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे संतापजनक प्रकार घडला आहे. मनपाच्या शवागारातून मृतदेहच बेपत्ता झाल्याचे निदर्शनास आले आहे. मनपा आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी याला पुष्टी दिली असून, याचा छडा लावण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या बाबत मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचे काम काल रात्री उशिरापर्यंत सुरु होते. या प्रकरणामुळे आरोग्य विभागाचा गलथान कारभार पुन्हा समोर आला आहे.

नेरुळ मधील रहिवासी असलेल्या २९ वर्षीय तरुणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.या तरुणाचे शवविच्छेदन करण्यासाठी ९  मे रोजी वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात शव आणले होते. मात्र मनपाच्या बेजबाबदार आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे या तरुणाचा मृतदेहच बेपत्त झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.   नेरुळ मधील कंत्राटदार असणाऱ्या व्यक्तीची तब्येत खराब झाल्याने नेरुळ येथील डी वाय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान ९  मे रोजी या तरुणाचा मृत्यू झाला. या दरम्यान तरुणाचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी वाशी येथील मनपा रुग्णालयात आणला. मात्र ९ दिवसांनंतर देखील मृतदेह ताब्यात मिळत नसल्याने मृत तरुणांच्या नातलगांनी आरोग्य प्रशासनाला धारेवर धरले. यानंतर मृतदेहच शवागारातून गहाळ  झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

या घटनेने हादरलेल्या नातलगांनी थेट वाशी पोलीस ठाणे गाठले. मनपा अधिकाऱ्यांमध्ये या घटनेने चांगलीच घबराट निर्माण झाली आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली. तर, सदर घटना घडली असल्याच्या वृत्ताला मनपा आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दुजोरा दिला असून, या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केल्याचेही त्यांनी सांगितले आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे. हे प्रकरण वाशी पोलिसांकडे सुपूर्द करून या तपासात नेमक्या घटनेची माहिती मिळाल्यावर तपासावर आधारित कारवाईनंतर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत अण्णासाहेब मिसाळ यांनी दिले आहेत.यापूर्वी कोविड टेस्टच्या नावाखाली मृतदेह तीन ते दहा दिवस ताब्यात देण्यास विलंब होत असल्याच्या अनेक तक्रारी असून, आता मृतदेहच गायब झाल्याने मनपा अधिकारी अडचणीत आले आहेत.