पनवेल : सिडको महामंडळाने बामणडोंगरी येथे बांधलेल्या गृहनिर्माणामधील २४३ दुकानांची विक्री इ -लिलाव पद्धतीने सोडत काढण्यात आली होती. मंगळवारी या सोडतीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सिडकोच्या अपेक्षित असणाऱ्या तीन पट दराने म्हणजेच सुमारे एका मीटरला साडेसहा लाख रुपयांचा दर मिळाल्याने गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा सिडकोच्या नियोजनावर विश्वास टाकल्याचे चित्र आहे.

१४ मार्चला सिडकोने या योजनेतील दुकानांच्या विक्रीची योजना जाहीर केली होती. बामनडोंगरी हा उलवे नोडचा परिसर असल्याने या परिसरालगत आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे. काही मिनिटांवर अटल सेतू (एमटीएचएल) तसेच नेरुळ उरण रेल्वेमार्गापासून हाकेच्या अंतरावर ही दुकाने विक्रीसाठी उपलब्ध असल्याने दुकान विक्रीकडे अनेक महिन्यांपासून व्यावसायिकांचे लक्ष लागले होते. यामध्ये सर्वात लहान दुकान १ चौरस मीटरचे तर सर्वात मोठे दूकान ३९ मीटरचे होते. १८ चौरस मीटरच्या दुकानांची अपेक्षित किंमत ३९ लाखांपेक्षा अधिक तर ३९ चौरस मीटरच्या दुकानाची आधारभूत किंमत ८२ लाखांपेक्षा अधिक होती. भविष्यात या दुकानांची किंमत वाढेल या उद्देशाने या सोडतीमध्ये अनेकांनी आपले नशीब आजमावले.

हेही वाचा – Shyam Manav: “ठाकरे पिता-पुत्रांना तुरुंगात धाडण्यासाठी अनिल देशमुखांवर फडणवीसांचा दबाव”, श्याम मानव यांचा आरोप

हेही वाचा – Shyam Manav: “..तर अनिल देशमुख यांनी आत्महत्या केली असती, त्यांनी…”, श्याम मानव यांचा दावा

सर्वसामान्य नागरिकांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याबरोबरच विकासक, उद्याोजक, व्यावसायिक अशा विविध घटकांच्या हिताकरिता सिडकोतर्फे नेहमीच विविध योजना राबविण्यात येतात. सदर २४३ दुकानांच्या विक्री योजनेद्वारे अनेक व्यावसायिकांना वेगाने विकसित होणाऱ्या व उत्तम कनेक्टिव्हिटी लाभलेल्या उलवे नोडमध्ये आपल्या व्यवसायाची वृद्धी करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. या योजनेला मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे सिडकोबद्दल नागरिकांच्या मनात असलेल्या विश्वासार्हतेवर शिक्कामोर्तब झाले आहे. – विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको