करोनाच्या दोन वर्षाच्या विलंबानंतर शाळेच्या पहिल्याच दिवसापासून ऑफलाईन शाळेला १५ जूनपासून सुरुवात झाली. दिवाळीच्या सुट्टीनंतर पालिकाक्षेत्रातील शाळा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार आहेत. सरकारी तसेच खासगी शाळांमध्ये पटसंख्या घटत असताना व विद्यार्थ्यांअभावी शिक्षकांच्या समायोजनाची परिस्थिती अनेक खासगी शाळांमध्येही आली असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे नवी मुंबई महापालिका शाळांमध्ये दरवर्षी विद्यार्थी संख्येत वाढ होत आहे. पालिका चालवत असलेल्या कोपरखैरणे येथील सीबीएसई शाळेत तब्बल १२५० आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढली असल्याने महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागानेच ट्विट करुन पालिकेचे यंदा कौतुकही केले आहे.परंतू दुसरीकडे पालिका शिक्षण विभागात तब्बल १०० शिक्षकांची कमतरता आहे. पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनीही तात्काळ तात्पुरती शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे आश्वासन पालकांना दिले आहे

हेही वाचा >>>नवी मुंबई: मोरा बंदरातील गाळामुळे जलप्रवासात खोळंबा; प्रवाशांकडून संताप व्यक्त

पालिकेने १०० शिक्षकांना तात्पुरत्या स्वरुपात घेण्यासाठी तयारी सुरु केली आहे.परंतू विद्यार्थी संख्येत वाढ होताना शाळांमध्ये शैक्षणिक दर्जा टिकवण्यासाठी व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी अपुऱ्या ठरत असलेल्या शिक्षकांची तात्काळ भरती करण्याची मागणी पालक व लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत आहे. सीबीएसई शाळेतील पालकांनी अपुऱ्या शिक्षकसंख्येमुळे आक्रमक होत दोन वेळा आय़ुक्तांची भेट घेतली असून दिवाळी सुट्टीनंतर शिक्षक न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.करोनाच्यामुळे दोन वर्षात विद्यार्थ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झालेले आहे.त्या काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात होते. परंतू पालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने या ऑनलाईन शिक्षणाला अनेक मर्यादा येत असल्याचे निदर्शनात आले आहे.जूनपासून सुरु झालेल्या नव्या शैक्षणिक वर्षात ४,४९६ विद्यार्थी वाढले असताना १०० शिक्षकांची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.नवी मुंबई महापालिका सीबीएसई शाळांमध्ये वाढत करत असताना दुसरीकडे अपुरा शिक्षक वर्ग यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे चित्र आहे. १५ जूनपासून महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांची घंटा खणखणली व हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे जूनमध्ये पुन्हा एकदा किलबिलाट सुरु झाला होता. शाळेच्या पहिल्याच दिवशी पालिका शाळांमध्ये महाराष्ट्र राज्याच्या माजी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही पालिकेच्या घणसोली शाळा क्रमांक ४२ येथे भेट दिली होती.नवी मुंबई महापालिकेमध्ये माध्यमिक व प्राथमिक शाळा असून महापालिकेमार्फत विविध माध्यमाच्या शाळा चालवल्या जातात.विशेष म्हणजे राज्यभरातील विविध शाळात विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत असताना नवी मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थी संख्याही दरवर्षी वाढत आहे. नवी मुंबई महापालिकेच्या प्राथमिक विभागाच्या एकूण ५३ शाळा असून पालिकेमार्फत मराठी,हिंदी,इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या शाळा चालवल्या जातात.तर पालिकेत ५३ पूर्वप्राथमिक वर्गही चालवले जातात.पालिकेच्या माध्यमिक विभागाच्या विविध माध्यमाच्या १८ शाळा आहेत.

हेही वाचा >>>वन विभागाला ‘सीआरझेड’ अधिकार देण्यास केंद्राचा नकार

पालिकेच्या दोन सीबीएसई शाळा असून आणखी तीन शाळा नव्याने सुरु करण्यात येणार आहेत.परंतू या नव्या ३ सीबीएसई शाळा अद्याप कागदावरच आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तात्काळ शिक्षक व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. दिवाळीनंतर दुसरे सत्र सुरु होणार असून दुसऱ्या सत्रात तरी मुलांना आवश्यक शिक्षक प्राप्त होतील अशी पालकांना आशा आहे. सानपाडा येथील श्री दत्त मंदिर शाळेत स्थानिक लोकप्रतिनिधींनीच विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये तात्पुरत्या स्वरुपात मदत म्हणून शिक्षकांना विद्यादानाचे काम करण्यास सांगीतले आहे. त्यामुळे पालिकेने शिक्षक भरती करण्यासाठी तात्काळ प्रक्रिया राबवण्याची मागणी पालक व लोकप्रतिनिधींनी केली आहे.


हेही वाचा >>>पनवेल मधील बारमध्ये छम छम आणि राजरोस गैरधंदे सुरूच

शिक्षक भरतीसाठी संस्थेद्वारे शिक्षक भरती करण्यासाठी निविदा मागवली असून त्याची मुदत ७ नोव्हेंबरपर्यंत आहे. यापूर्वी दोन वेळा मागवलेल्या निविदेला प्रतिसाद मिळाला नव्हता परंतू यावेळी एक संस्था इच्छुक असून निविदा प्राप्त होताच तात्काळ शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.दुसऱ्या सत्रात विद्याथर्यांना शिक्षक तुटवडा होणार नाही यासाठी पालिका प्रयत्नशील आहे.जवळजवळ १०० शिक्षकांची कमतरता आहे. तात्पुरत्या स्वरुपात शिक्षक भरती करण्याची प्रक्रिया सुरु असून लवकरात लवकर शिक्षकांची उपलब्धता करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे.– योगेश कडुस्कर ,उपायुक्त शिक्षण

नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढत असताना शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.सानपाडा येथील श्री दत्त विद्या मंदिर शाळा क्रमांक १८ मध्येही ६ शिक्षकांची कमतरता आहे.पालिकेने तात्काळ शिक्षकांची भरती करुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान दूर करावे. -सोमनाथ वास्कर, माजी नगरसेवक

Story img Loader