श्री बालाजी सहकारी गृहनिर्माण संस्था, नेरूळ सेक्टर- १८

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेरूळ येथील बालाजी संकुलाची उभारणी झाल्यापासून त्यात दत्त मंदिर उभारण्यात आले आहे. या सोसायटीत फार पूर्वीपासून दत्ताची उपासना केली जात आहे. या उपासनेला समाज प्रबोधनाची जोड आहे, हे त्याचे प्रमुख वैशिष्टय़.

१९९४ मध्ये बालाजी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी उभी राहिली. पुढे वर्षभराने  संकुलाच्या जाणत्या पिढीने पुढाकार घेऊन सोसायटीत दत्त मंदिर उभारले. त्या दिवसापासून ते आजमितीस येणाऱ्या पिढय़ांनीही समाज प्रबोधनाचा वारसा पुढे जोपासला. या संकुलात दोन इमारतींमध्ये एकूण १०० कुटुंबे आहेत. दत्ताची अखंड पूजा करणे ही इथल्या प्रत्येकाची दिनचर्या.

सोसायटीच्या आवारात दत्त मंदिर उभे आहे. भोवताली भिंतींवर सुंदर विचार लिहिलेले आहेत. रोजच्या जगण्याच्या धबडग्यातून काही क्षण प्रार्थनेत घालवता यावेत आणि मनाला शांती मिळावी, हा यामागील हेतू. दर गुरुवारी हरिपाठाच्या वाचनासाठी तरुण विद्यार्थी, मुले आणि महिला येथे येतात.

नेरूळमधील मोजक्या दत्त मंदिरांपैकी एक मंदिर असे या मंदिराचे वैशिष्टय़. सोसायटीत भाविकांची दर्शनासाठी सकाळ आणि सायंकाळ गर्दी होते. दत्त जयंतीला २० हजार भाविकांचे नियोजन करतात.

आधी एक दिवसाची दत्त जयंती नंतर भाविकांचा प्रतिसाद पाहून दोन दिवसांचा दत्तोत्सव साजरा केला जातो. पहिल्या दिवशी हरिकेश, देव जागरण तर दुसऱ्या दिवशी देव जन्म सोहळा आणि महाप्रसादाचे वाटप केले जाते. दत्त जयंतीबरोबर गणेशोत्सव, दिवाळी, दसरा हे सणही मोठय़ा उत्साहात साजरे केले जातात.

सोसायटीच्या छोटय़ा जागेतही वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था, मुलांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संकुलात वेगळी अशी आसन व्यवस्था नसली तरीही संध्याकाळी अनेक ज्येष्ठ नागरिक, पुरुष मंडळी मंदिराच्या परिसरात एकत्र बसतात. दत्ताची उपासना करतात. तसेच त्या ठिकाणी अनेक गप्पागोष्टीही रंगतात. अपुऱ्या जागेअभावी नवीन ठिकाणी वृक्षारोपण करणे कठीण असल्याने आधीच्याच वृक्षलागवडीकडे लक्ष देण्यात आले आहे.

आरोग्यावर भर

संकुलातील कुटुंबीयांचे आरोग्य संतुलित राहण्यासाठी अनेक आरोग्य शिबिरे घेतली जातात, तसेच रोजच्या जीवनातील आहार कसा ठेवावा, आहार संतुलन कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले जाते; तसेच मोठय़ा प्रमाणात पोलिओ लसीकरण राबविले जाते. पोलिओ लसीकरण सोसायटीपुरती मर्यादित न ठेवता आजूबाजूच्या परिसरातील लहान मुले या ठिकाणी पोलिओ लस घेत असतात.

पूनम धनावडे

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shree datta temple in shri balaji cooperative housing society