फालुदा, कुल्फी हे साऱ्यांचेच आवडते पदार्थ. उन्हाळ्याच्या दिवसांत या पदार्थाची चव तर आणखीनच वाढते. गारवा मिळविण्याच्या पर्यायांमधील एक असा खास पर्याय म्हणून अनेकांच्या उडय़ा थंड मिष्टान्नांवर पडतातच. फालुदा सर्वत्र नेहमीच उपलब्ध असते. यात केवळ पावसाळ्याचा अपवाद म्हणावा लागेल. यात आईस्क्रीम वा आइस्क्रीमशिवाय फालुदा ‘सव्‍‌र्ह’ केला जातो. यालाच ‘फ्रोजन डेझर्ट’ म्हणतात. ‘स्टार्च’चा पुरवठा होण्यासाठी फालुदा सेवच्या सोबत रोझ सिरप आणि सुकामेव्याची लज्जत चाखायला मिळते. सीवूडस्मधील सावरिया या छोटेखानी आईस्क्रीम आणि फालुदा सेंटरमध्ये सध्या खवय्यांची चंगळ आहे. मूळच्या राजस्थानातील गोपाल साहू या तरुणाने शालेय शिक्षण अध्र्यावर सोडून वडिलोपार्जित आइस्क्रीमच्या व्यवसायाला सुरुवात केली.

हैदराबाद, गुजरात, हरयाणा, पंजाब यांसारख्या ठिकाणी नशीब आजमावल्यानंतर नवी मुंबईतील सीवुड्स येथे छोटेखानी दुकान ८ महिन्यांपूर्वी थाटले. खवय्यांना काही तरी वेगळेपणा देण्यासाठी त्यांनी कुल्फी आणि फालुदा यांचे फ्युजन कुल्फी फालुदा ही खासियत ठेवली. वडिलोपार्जित व्यवसाय असल्यामुळे ती कौशल्य आपसूक अंगी होती. या फालुदा कुल्फीला बनविण्यासाठी सेव, सब्जा, गुलकंद, आईस्क्रीम, रबडी, खवा, साखर इ. सामग्री लागते. सावरिया या ग्रामदेवताच्या नावावरून सावरिया आईस्क्रीम आणि फालुदा सेंटर असे नामकरण करण्यात आले. यासाठी महिन्याला २० किलो साखर, १ किलो सब्जा, ५ किलो शेव, २ किलो गुलकंद, ११ क्विंटल दूध, ३० लिटर आईस्क्रीम खर्ची पडते. कल्याण येथेही आईस्क्रीमचे दुकान आहे. तेथे आईस्क्रीम बनविण्यात येतात. रोज कल्याणवरून सीवुड्स येथे माल मागवला जातो. यासाठी येथे गावचे ५ कामगार ठेवण्यात आले आहे. याशिवाय येथे कुल्फी, रोल, कसाटा, मलाई मँगो फालुदा, केसर पिस्ता, रोज फालुदा, केसर लस्सी मिळते. खास अमेरिकन ड्रायफ्रुट आईस्क्रीम येथे बनवले जाते. त्यात ड्रायफ्रुट्सची मात्रा मोठय़ा प्रमाणात असते. जवळच डी-मार्ट तसेच महाविद्यालयीन परिसर असल्याने ग्राहकांची संख्या मोठय़ा प्रमाणावर असते. याशिवाय जेवणानंतर शतपावली करण्यासाठी जाणाऱ्यांना हे सेंटर ट्रीट ठरत आहे.

सावरिया आईस्क्रीम फालुदा सेंटर

  • कुठे?, नेरुळ, शॉप नं. – २, तिरुपती कॉम्प्लेक्स, सेक्टर-४४, पेट्रोल पंपच्या बाजूला.
  • कधी?- सकाळी १० ते रात्री १२ वा.