सिडकोकडून लवकरच लॉटरी
मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)च्या प्रस्तावित शिवडी-न्हावा ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना साडेबावीस टक्के जमिनी देण्याचे सिडकोने मान्य केले आहे. या संदर्भात सोमवारी नवी मुंबईत सिडको कार्यालयात झालेल्या बैठकीत या बाधितांना नवी मुंबई विमानतळबाधितांप्रमाणे साडेबावीस टक्के विकसित भूखंड देण्याचे सिडकोच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले. या लाभधारकांच्या भूखंडाची लॉटरी लवकरच काढण्यात येणार आहे.
शिवडी-न्हावा ट्रान्स हार्बर लिंकचा मार्ग उरणमधील राष्ट्रीय महामार्ग ‘४ ब’मधून जात असल्याने या ठिकाणची जमीन प्रकल्पाकरिता संपादित करण्यासाठी सिडको व एमएमआरडीएचे प्रयत्न सुरू होते. या भूसंपादनाला जासई, न्हावा, गव्हाण, चिर्ले या गावांतील शेतकऱ्यांनी विरोध केला होता. यासाठी शेतकरी समितीही स्थापन करण्यात आली होती. समितीने सिडकोने प्रथम शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती. त्यानुसार सिडकोने पुढाकार घेऊन हा निर्णय घेतला. या बाधितांच्या नावाच्या भूखंडाची लॉटरी काढून पुष्पक नगरातच भूखंड दिले जातील अशी माहिती सिडकोच्या अधिकाऱ्यांनी दिली.