संगणकीय सोडत संकेतस्थळ आणि फेसबुक पेजवर घरबसल्या पाहू शकणार; १ लाख ९१ हजार ८३८ अर्जदार पात्र
गेली दीड महिना सरू असलेल्या सिडकोच्या १४ हजार ८३८ घरांच्या विक्री धमाक्याला मंगळवारी होणाऱ्या सोडतीमुळे पूर्णविराम मिळणार आहे. या घरांसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून १ लाख ९१ हजार ८४२ अर्ज आले असून यातील १४ हजार ८३८ भाग्यवंत ठरणार आहेत. बेलापूर येथील सिडकोच्या मुख्यालयात होणाऱ्या या संगणकीय सोडतीचे थेट प्रक्षेपण सिडकोचे संकेतस्थळ आणि फेसबुक पेजवर उपलब्ध होणार असल्याने अर्जदार घरबसल्या ही सोडत पाहू शकणार आहेत. मंगळवारी सोडत असल्याची व सोडतीनंतर घर लागल्यास त्याची कल्पना एसएमएमद्वारे देण्याचीही सुविद्या उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सिडकोने अनेक वर्षांनंतर महागृहनिर्मिती हाती घेतली आहे. खारघर, कळंबोली, तळोजा, द्रोणागिरी आणि घणसोली या सिडकोच्या शहरी भागात एकाच वेळी १४ हजार ८३८ घरे बांधली जाणार आहेत. या घरांचे एकीकडे बांधकाम सुरू असतानाच त्यांची सोडत काढण्याची संकल्पना व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी अमलात आणली आहे. यापूर्वी घरे पूर्ण झाल्यानंतरच सिडको विकत होती. त्यामुळे ग्राहकांना एकाचवेळी पैसे उभे करताना नाकीनऊ येत होते.
१५ ऑगस्टपासून या घरांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. १५ सप्टेंबरला ही मुदत संपली. सिडकोच्या घरांची ऑनलाइन विक्री करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे त्याला प्रारंभी कमी प्रतिसाद मिळाला पण मुदत संपण्यापूर्वी १४ हजार घरांसाठी एक लाख ९१ हजार ८४२ अर्ज आले आहेत. त्यातील केवळ चार अर्ज बाद झालेले आहेत. हे सर्व अर्ज मंगळवारी पाच जणांच्या एका समितीसमोर एक विशेष सॉफ्टवेअरद्वारे संगणकीय सोडतीने प्रसिद्ध केले जाणार आहेत. या सर्व घरांतील ५ हजार २६२ घरे ही आर्थिकदृष्टय़ा दुर्बळ घटकासाठी राखीव असून ती पंतप्रधान आवास योजनेसाठी जाहीर करण्यात आलेली आहेत. त्यामुळे या घरांना केंद्र व राज्य सरकारकडून अडीच लाख रुपये अनुदान मिळणार आहे. जवळपास २६० चौरस फूट क्षेत्रफळाचे हे घर १८ ते २० लाखांत मिळणार आहे. त्यानंतर शिल्लक ९ हजार ५७६ घरे ही अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी खुली असून ही घरे २५ ते २९ लाख रुपयांत मिळणार आहे. या घरांचे क्षेत्रफळ ३०० चौरस फूट राहणार आहे. सिडकोच्या निकृष्ट बांधकामाबाबत कितीही तक्रारी असल्या तरी ही घरे घेण्यासाठी ग्राहकांच्या उडय़ा पडत असल्याचे दिसून येते. सुमारे दोन लाख अर्जामधून १४ हजार ८३८ घरांची सोडत सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होणार असून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत संपणार आहे. एखाद्या राखीव घरांसाठी अर्ज न आल्यास ती घरे शिल्लक राहण्याची शक्यता आहे.
सिडकोने पहिल्यांदाच ऑनलाइन सोडत काढलेली आहे. त्यामुळे तांत्रिक जबाबदारी वाढली असून सर्व तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे. यासाठी लागणारी गोपनीयता व सुरक्षितता पाळण्यात आलेली आहे. मंगळवारी या सोडतीचे थेट प्रेक्षपण सिडकोच्या संकेतस्थळावर पाहण्यास मिळणार आहे. त्याचबरोबर घर लागणाऱ्या भाग्यवंतांना एसएमएमवर कळविण्यात येणार आहे. – लक्ष्मीकांत डावरे, पणन व्यवस्थापक, सिडको