शेखर हंप्रस / संतोष जाधव

‘लोकसत्ता’ पाहणीतील वास्तव; वाहनचालकांना ना वाहतूक पोलिसांचा ना अपघातांचा धाक 

सुनियोजितपणे वसवलेल्या नवी मुंबईत बांधण्यात आलेल्या प्रशस्त रस्त्यांमुळे येथील वाहतूक वेगवान झाली आहे. मात्र, या रस्त्यांवर चालकांच्या बेशिस्तीचेही दर्शन घडत आहे. पामबिच मार्ग, ठाणे-बेलापूर रस्ता अशा रस्त्यांवर वाहने भरधाव वेगाने पळवताना वाहनचालकांना सिग्नलचेही भान उरले नसल्याचे ‘लोकसत्ता’च्या पाहणीतून समोर आले आहे. प्रत्येक सिग्नलवर सरासरी १० ते १५ जण नियम तोडत आहेत.

सिग्नलच्या ठिकाणी रस्त्यावर एक वाहनमर्यादा रेषा आखलेली असते. सिग्नल लाल असताना वाहनांनी या मर्यादेच्या पुढे वाहने नेऊ नयेत, असा नियम आहे. मात्र, नवी मुंबईतील एकाही रस्त्यावर या नियमाचे पालन होताना दिसत नाही. चालक सर्रासपणे ही रेषा ओलांडून झेब्रा क्रॉसिंगवर वाहने उभी करतात. त्यातही सिग्नल हिरवा होण्याआधीच गाडय़ा पिटाळण्याची स्पर्धाच लागलेली असते. अपवादाने एखाद्या चालकाने नियमानुसार वाहन उभे केले असल्यास मागील वाहने हॉर्न वाजवून त्याला पुढे सरकण्यास भाग पाडतात.

२०१८ मध्ये वाहतूक नियम तोडणाऱ्या ३ लाख १७ हजार ९५४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर ई चलानद्वारे ३१ ओक्टोंबपर्यंत ३५७५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ‘देशातील लोकांची मानसिकता ही चौकातील सिग्नलवर कळते’ मराठी चित्रपटातील हा संवाद राग येणारा असला तरी वस्तुस्थितीला धरून आहे. नवी मुंबई शहरात शंभर टक्के साक्षरता असली तरीही वाहतुकीचे नियम पाळण्याचे वावडे असल्याचे चित्र आहे.

‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधींनी नवी मुंबई शहराअंतर्गत रस्त्यांवरील ही स्थिती पाहता पाहणी केली असता यापेक्षा भयानक स्थिती असल्याचे समोर आले. काही मोजके सिग्नल वगळता सर्वच चौकांत वाहतूक नियमांचे उल्लंघन होत आहे. झेब्रा क्रॉसिंग तर कोणी पाळतच नाही. तर प्रत्येक सिग्नलवर १० ते १५ जण सहज सिग्नल तोडत असतात.

शहरात सर्वात व्यस्त तीन रस्ते आहेत. ठाणे-बेलापूर, वाशी-कोपरखैरणे, वाशी-बेलापूर आणि पामबीच. याशिवाय नव्याने प्रचंड वाहतूक वाढत जाणारा रस्ता म्हणून ऐरोली मार्गे मुलुंडकडे जाणारा रस्ता ओळखला जात आहे.

यापैकी वाशी-कोपरखैरणे रस्त्यावर वाशी हायवे, छ. शिवाजी महाराज चौक आणि काही प्रमाणात रा.फ.नाईक चौकात सिग्नल पाळले जातात अन्यथा अपना बझार, जैन मंदिर, ब्ल्यू डायमंड चौक, आणि तीन टाकी चौकातील सिग्नल व्यवस्था असून अडचण नसून खोळंबाप्रमाणेच आहे.

नुकतेच काही दिवसांपूर्वी ब्ल्यू डायमंड चौकात वाहतूक पोलिसांनी अचानक केलेल्या कारवाईत केवळ सहा तासांत ५५० पेक्षा जास्त जणांवर कारवाई करण्यात आली होती. यावरून वाहतुकीची अवस्था काय झालीय याचा अंदाज येतो.

सिग्नलवर सहज नजर टाकली तरी दोन गाडय़ांच्या मधून वा डावीकडून दुचाकी आणि रिक्षा तसेच छोटय़ा कार ओव्हरटेक करून सिग्नलच्या शक्य तेवढय़ा समोर येऊन थांबण्याचा प्रयत्न करतात तर प्रसंगी थेट सिग्नल तोडलेही जातात. यात आघाडीवर दुचाकीस्वार आणि रिक्षाचालक आहेत. यात महिलाचालकही आघाडीवर असल्याची माहिती एका वाहतूक हवालदाराने दिली.

२५० मनुष्यबळाची गरज

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात एकूण ४६० अधिकारी कर्मचारी आहेत. वाढती लोकसंख्या आणि वाहनसंख्या पाहता हे मनुष्यबळ खूप अपुरे असून अजून किमान २५० जणांची गरज आहे. अनेक वर्षांपासून दरवर्षी हवे असलेल्या मनुष्यबळाची मागणी केली जाते. मात्र पोलीस भरती प्रक्रिया झाल्यावर दहा-बारा पोलीस कर्मचारी दिले जातात.

वर्षभरात ३ लाख १७ हजार ९५४ जणांवर कारवाई

* २०१८ मध्ये वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर तब्बल ३ लाख १७ हजार ९५४ जणांवर कारवाई करण्यात आली असून ६ कोटी ५२ लाख ७४ हजार ३९० दंड रक्कम वसुली करण्यात आली आहे. यात २० हजार ६६७ सिग्नल तोडणाऱ्यांकडून ४१ लाख ८० हजार १४० रुपयांची दंड वसुली करण्यात आली आहे.

* नवी मुंबईतील वाहतूक सुरळीत होण्यासाठी कायद्याचे उलंघन करणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी वाहतूक विभाग सीसीटीव्हीची मदत घेते. यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील ५७३ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेण्यात येत असून पैकी २५७ सीसीटीव्ही केवळ परिमंडळ एकमध्ये आहेत. २०१७ मध्ये एकूण ३०७४ जणांना ईचलानद्वारे दंड ठोठावला असून त्याद्वारे १ लाख ९९ हजार ५०० रुपयांची दंड वसुली करण्यात आली आहे. तर या वर्षी ३१ ओक्टोबपर्यंत ३५७५ जणांवर कारवाई करण्यात येऊन ५ लाख ८० हजारांची दंड वसुली करण्यात आली आहे.

स्वयंचलित वाहतूक नियंत्रक त्याच्या नावाप्रमाणेच ही व्यवस्था असून वाहनचालकांनी त्याचे पालन करणे अपेक्षित आहे. आम्हीही वेळोवेळी कारवाई करून नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई करीत असतो. वाहतुकीचे नियम पाळा. कुठेही वाहतूक कोंडी वा अपघात होणार नाहीत. पोलिसांना सहकार्य करा.

– सुनील लोखंडे, उपायुक्त वाहतूक विभाग

Story img Loader