वाहतूक कोंडीत भर; पादचाऱ्यांची अडचण

सीमा भोईर, पनवेल</strong>

पनवेल शहरातील बेशिस्तीच्या बेपर्वाईसाठी शहरातील सिग्नल व्यवस्थाही कारणीभूत आहे. काही सिग्नल तर गेल्या तीन वर्षांपासून बंद आहेत. त्यामुळे वाहनचालक कसेही कुठेही घुसत असल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे धोक्याचे झाले आहे.

पालिकेचे पार्किंग धोरणच नसल्याने पनवेल शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. जागा मिळेल तिथे वाहनं उभी केली जात असल्याने अगोदरच अपुरे रस्ते असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यात भर पडत आहे ती बंद सिग्नलची.

शहरात मुख्य रस्त्यावर एस. टी. स्टॅण्ड, आंबेडकर पुतळा, अमरधाम नाका, गार्डन हॉटेल, नवीन पनवेलच्या दिशेने जाण्यासाठी असे पाच सिग्नल्स आहेत. त्यातील आंबेडकर चौक, अमरधाम, एस. टी. स्टॅण्ड येथील सिग्नल बंद असल्याने रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांची तारांबळ उडत आहे. कोणी कुठूनही वाहन घुसवत आहेत.

पनवेल शहर, रेल्वे स्थानक व मुख्य रस्त्याला जोडणारा आंबेडकर चौकात तर परिस्थिती वाईट आहे. येथे सिग्नल बसविले आहेत, मात्र तांत्रिक कारणामुळे ते सुरू करणे शक्य नसल्याचे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे या ठिकाणी सतत वाहतूक पोलीस असणे गरजेचे आहे. पोलीस कर्मचारी नसल्यास वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. दीड वर्षांपूर्वी अमरधाम येथील सिग्नल्स सुरू करण्यात आला होता. मात्र तो काहीच दिवसात बंद करण्यात आला. वाहतूक पोलीस व वाहनचालकांचे नेहमीच वाद होत आहेत. वाहतूक विभागाने बंद सिग्नल लवकरात लवकर सुरू करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, अशी पनवेलकरांनी मागणी केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील व एस.टी. स्थानकासमोरील सिग्नल सुरू करणे सद्य:स्थितीत शक्य नाही. रस्ते छोटे असल्याने सिग्नलमुळे तिथे अधिकच वाहतूक कोंडी होऊ शकते. अमरधाम नाका येथील सिग्नल सुरू व्हावा म्हणून प्रयत्न सुरू आहेत.

– अभिजित मोहिते, पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा.

Story img Loader